उदयपूर मर्डरमध्ये मोठा खुलासा; आरोपींचे पाकिस्तान कनेक्शन, 45 दिवस कराचीत ट्रेनिंगही घेतली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 07:21 PM2022-06-29T19:21:30+5:302022-06-29T19:21:38+5:30
Udaipur Murder: राजस्थानच्या उदयपूर येथील टेलर कन्हैयालाल हत्याकांडात दोन्ही आरोपींचे पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहे. राजस्थानचे गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव यांनी याला दुजोरा दिला.
उदयपूर:राजस्थानच्या उदयपूर येथील टेलर कन्हैयालाल हत्याकांडात दोन्ही आरोपींचे पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहे. राजस्थानचे गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव यांनी याला दुजोरा दिला. हे दोन धर्मातील भांडणाचे प्रकरण नसून दहशतवादी हल्ला असल्याचे त्यांनी सांगितले. दोन आरोपींपैकी एक मोहम्मद घौस 2014-15 मध्ये कराचीला 45 दिवसांचे प्रशिक्षण घेऊन आल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानशी संबंध
एवढेच नाही तर 2018-19 मध्ये घौस मोहम्मद अरब देशांमध्ये गेला होता. गेल्या वर्षी तो नेपाळला गेल्याचेही समोर आले आहे. अशा परिस्थितीत आरोपी घौस मोहम्मदचे कनेक्शन थेट पाकिस्तानशी आहे, त्यामुळे राजस्थान सरकारने आता संपूर्ण प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवले आहे. विशेष म्हणजे, आरोपी घौस मोहम्मद आणि रियाज जब्बार हे दोघेही सतत पाकिस्तानात बसलेल्या लोकांच्या संपर्कात होते आणि दोघेही पाकिस्तानच्या 8 ते 10 क्रमांकावर सतत बोलत होते, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
आरोपींना फाशी मिळणार
मंत्री राजेंद्र यादव म्हणाले, 'उदयपूरची ही घटना म्हणजे परदेशात बसलेल्या दहशतवादी शक्तींचा भारतातील शांतता बिघडवण्याचा आणि हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवण्याचा सुनियोजित कट होता. ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी जीव मुठीत घेऊन दोन्ही आरोपींना पकडले, त्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. यासोबतच या पाचही जणांना प्रमोशन मिळणार आहे. यासोबतच मंत्री राजेंद्र यादव म्हणाले की, ही घटना अचानक घडली आहे, त्यामुळे ही बाब पूर्णपणे गुप्तचर यंत्रणेचे अपयश मानता येणार नाही. या जघन्य गुन्ह्याची शिक्षा फाशीपेक्षा कमी होणार नाही.
UAPA कायद्यान्वये गुन्हा दाखल
राजस्थानचे डीजीपी एमएल लाथेर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उदयपूरमधील टेलर कन्हैयालालची हत्या ही दहशतवादी घटना मानून यूएपीए कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींच्या अन्य देशांतील संपर्कांचीही माहिती समोर आली आहे. कन्हैयालालच्या हत्येचा आरोप असलेला घौस मोहम्मद हा 2014 साली पाकिस्तानातील कराची शहरात गेला होता, असेही राज्याचे पोलीस प्रमुख लाथेर यांनी सांगितले. तो दावत-ए-इस्लामी नावाच्या संघटनेशी संबंधित होता. उत्तर प्रदेशातील कानपूरसह दिल्ली आणि मुंबईमध्ये दावत-ए-इस्लामीची कार्यालये असल्याचेही त्यांनी सांगितले.