अरे व्वा! अपमानानंतर पोलीस कॉन्स्टेबल पदाचा राजीनामा; क्रॅक केली UPSC, होणार अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 16:34 IST2024-04-17T16:27:57+5:302024-04-17T16:34:47+5:30
उदय कृष्णा रेड्डी यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा क्रॅक करून मोठं यश मिळविलं आहे. ही त्यांच्या कारकिर्दीतील मोठी झेप तर आहेच पण एका अपमानाचा बदलाही आहे.

फोटो - आजतक
पोलीस कॉन्स्टेबल असलेले उदय कृष्णा रेड्डी यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा क्रॅक करून मोठं यश मिळविलं आहे. ही त्यांच्या कारकिर्दीतील मोठी झेप तर आहेच पण एका अपमानाचा बदलाही आहे. पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांचा अपमान केल्यानंतर उदय कृष्णा रेड्डी यांनी पोलिसाची नोकरी सोडली होती. त्यावेळी स्वत: वरिष्ठ अधिकारी बनण्याचा निर्धार केला, जो आता 6 वर्षांनी पूर्ण झाला आहे.
2013 ते 2018 पर्यंत उदय कृष्णा रेड्डी हे आंध्र प्रदेश पोलिसात कॉन्स्टेबल पदावर होते. 2018 मध्ये सर्कल इन्स्पेक्टर (CI) ने सुमारे 60 सहकारी पोलिसांसमोर उदय यांचा अपमान केला होता. या अपमानाने दुखावलेल्या उदय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि एक दिवस अधिकारी होण्याचा संकल्प केला.
कॉन्स्टेबल पदाचा राजीनामा दिल्यानंतर, उदय कृष्णा रेड्डी यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी केली आणि आयएएस अधिकारी होण्यावर लक्ष केंद्रित केले. त्याने UPSC नागरी सेवा परीक्षा 2023 मध्ये 780 वा क्रमांक मिळविला आहे.
उदय कृष्णा रेड्डी हे आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील सिंगरायकोंडा मंडळातील उल्लापलेम गावचे रहिवासी आहेत. लहान वयातच त्यांनी आई-वडील गमावले. त्यानंतर आजीने त्यांची काळजी घेतली. 2013 मध्ये हवालदाराची नोकरी मिळाली. रेड्डी यांनी पाच वर्षांच्या सेवेनंतर राजीनामा दिला आणि चौथ्या प्रयत्नात 780 वा क्रमांक मिळवून आपलं लक्ष्य गाठलं.
आदित्य श्रीवास्तव यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा परीक्षा (UPSC CSE) 2023 मध्ये अखिल भारतीय रँक वन मिळवला आहे. अनिमेश प्रधान दुसऱ्या क्रमांकावर, डोनुरु अनन्या रेड्डी तिसऱ्या क्रमांकावर, पीके सिद्धार्थ रामकुमार आणि रुहानी अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. या वर्षी एकूण 1016 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.