CJI Uday Umesh Lalit: आनंदसोहळा! लेक सरन्यायाधीश झाला; कामकाज पाहताना वडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 01:37 PM2022-08-30T13:37:04+5:302022-08-30T13:38:14+5:30
सरन्यायाधीश लळित यांच्या ९० वर्षीय वडिलांनी थेट सुप्रीम कोर्टात हजेरी लावत आपल्या मुलाचे काम समाधानाने पाहिले.
नवी दिल्ली: देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. उदय उमेश लळीत (CJI Uday Umesh Lalit) विराजमान झाले. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या. लळीत यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. मात्र, यानंतर सरन्यायाधीश झालेल्या आपल्या मुलाचे पहिल्या दिवसाचे कामकाज पाहण्यासाठी वडिलांनी थेट सर्वोच्च न्यायालय गाठले. सरन्यायाधीशांसमोर सुरू असलेल्या सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहून डोळे भरून आपल्या मुलाला सरन्यायाधीश म्हणून काम करताना पाहिले अन् तृप्त मनाने परतले.
भारताचे सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांनी त्यांचे वडील, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील उमेश रंगनाथ ललित यांच्यासाक्षीने पहिल्या दिवसाची सुरुवात केली. उमेश रंगनाथ लळीत यांचे वय वर्ष ९० आहे. न्यायमूर्ती उदय लळीत यांनी सरन्यायाधीश कामकाजाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या वडिलांनीही न्यायालयात हजेरी लावली. सर्वोच्च न्यायालयातील इतर वकिलांप्रमाणे ते आपल्या मुलाला सरन्यायाधीश म्हणून काम करताना पाहत होते.
सरन्यायाधील मुलाला अभिवादन करून बाहेर पडले
उमेश रंगनाथ लळीत हे जवळपास २० मिनिटे न्यायालयाचे कामकाज पाहत न्यायकक्षात उभे होते. त्यानंतर न्यायालयाच्या प्रथेप्रमाणे सरन्यायाधीक्ष उदय लळीत यांना अभिवादन करुन ते बाहेर पडले. ज्येष्ठ वकील उमेश आर लळित न्यायालयात उभे असल्याचे पाहून काही ज्येष्ठ वकिलांनी त्यांना बसण्याची विनंती केली. पण त्यांनी नकार दिला. आपला मुलगा सरन्यायाधीशपदी विराजमान होत असतानाचा एक क्षणही त्यांना चुकवायचा नव्हता. न्यायालयात पुढच्याच रांगेच्या कोपऱ्यात उभे राहून ते कामकाज पाहत होते. उमेश आर लळित हे जेष्ठ वकिल असल्याने ते न्यायकक्षात वकिली पोशाखात होते. साधारण २० मिनिटे कामकाज पाहिल्यानंतर ते तेथून परतले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम न करणारे उदय लळीत हे दुसरे सरन्यायाधीश असतील. वकिलीतून ते थेट या पदापर्यंत पोहोचले आहेत. उदय लळीत यांच्या कुटुंबात तब्बल १०२ वर्षांचा वकिलीचा वारसा आहे. लळीत यांचे आजोबा, चार काका व वडिलही वकीली करायचे. वडील उमेश रंगनाथ लळीत हे महाराष्ट्रातील नामवंत वकील होते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ते निवृत्त झाले आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून उदय लळीतही कायदे क्षेत्रात उतरले आहेत.