'सामाजिक दुष्कृत्यांसाठी सनातन धर्म जबाबदार', उदयनिधी स्टॅलिन आपल्या वक्तव्यावर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 08:43 PM2023-09-03T20:43:43+5:302023-09-03T20:46:18+5:30
'आज I.N.D.I.A. आघाडीचा हिंदुविरोधी चेहरा उघड झाला'; भाजपची टीका
Udaynidhi Stalin Statement: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचे पुत्र आणि राज्य सरकारमध्ये क्रिडा मंत्री असलेले उदयनिधी स्टॅलिन (Udaynidhi Stalin) यांनी सनातन धर्माबाबत दिलेल्या वक्तव्यावरुन तामिळनाडूपासून दिल्लीपर्यंत गदारोळ सुरू झाला आहे. अनेक नेते स्टॅलिन यांच्यावर टीका करत असून, वक्तव्य मागे घेण्याची मागणी होत आहे. पण, उदयनिधी स्टॅलिन आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.
संबंधित बातमी- उदयनिधी स्टॅलिनच्या 'सनातन धर्म मिटवा' विधानावर काँग्रेसची प्रतिक्रिया; नाना पटोले म्हणाले...
उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना मलेरिया, डेंग्यू अन् कोरोनाशी केली आणि याला संपवायला पाहिजे, असे असे म्हटले. उदयनिधी यांच्या वक्तव्यानंतर भाजप INDIA आघाडी आणि काँग्रेसवर जोरदार टीका करत आहे. DMK इंडिया आघाडीचा भाग असल्यमुळे, संपूर्ण आघाडी भाजपच्या निशाण्यावर आली आहे. काँग्रेसनेही या वक्तव्यापासून स्वतःला दूर केले आहे. तरीदेखील, उदयनिधी यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे.
'माझ्या वक्तव्यावर ठाम'
या विधानावरुन झालेल्या वादानंतर आपण आपल्या मुद्द्यावर ठाम असल्याचे उदयनिधी यांचे म्हणणे आहे. त्यांनी भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालविया यांच्या ट्विटला उत्तर देताना म्हटले की, 'मी सनातन धर्मामुळे पीडित आणि उपेक्षितांच्या वतीने बोललो. मी बोललेल्या प्रत्येक शब्दावर ठाम आहे. सनातन धर्म आणि त्याचा समाजावर होणारा नकारात्मक परिणाम, याविषयी विस्तृत संशोधन करणारे पेरियार आणि आंबेडकर यांचे विस्तृत लेखन कोणत्याही व्यासपीठावर मांडण्यास मी तयार आहे.'
I never called for the genocide of people who are following Sanatan Dharma. Sanatan Dharma is a principle that divides people in the name of caste and religion. Uprooting Sanatan Dharma is upholding humanity and human equality.
— Udhay (@Udhaystalin) September 2, 2023
I stand firmly by every word I have spoken. I spoke… https://t.co/Q31uVNdZVb
'मी माझ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पुन्हा सांगतो, डासांमुळे पसरणाऱ्या डेंग्यू आणि मलेरियाप्रमाणे सामाजिक दुष्कृत्यांसाठी सनातन धर्म जबाबदार आहे. माझ्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी मी तयार आहे, मग ते कायद्याचे न्यायालय असो किंवा लोकांचे न्यायालय असो. खोट्या बातम्या पसरवणे थांबवा,' असे ट्विट त्यांनी केले.
काय म्हणाले अमित मालवीय?
'राहुल गांधी प्रेमाच्या दुकानाविषयी बोलतात, पण काँग्रेसचा मित्रपक्ष द्रमुकचे वंशज सनातन धर्म नष्ट करण्याविषयी बोलतात. काँग्रेसचे मौन हे नरसंहाराच्या या आवाहनाचे समर्थन आहे. आज I.N.D.I.A. आघाडीचा भारतविरोधी आणि हिंदुविरोधी चेहरा उघड झाला आहे. I.N.D.I.A. आघाडीला संधी मिळाली, तर ते हजारो वर्षे जुन्या सनातन धर्माला नष्ट करतील,' अशी टीका त्यांनी केली.
संबंधित बातमी- सनातन धर्म मिटवा म्हणणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांना अन्नामलाईंचं प्रत्युत्तर म्हणाले...