पाकच्या 'बाजवा'चा बाजा वाजवा, 56 इंच छातीवाल्यांना उद्धव ठाकरेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 08:44 AM2018-09-08T08:44:43+5:302018-09-08T08:45:57+5:30
पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी हा पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा भारतासाठी पाकिस्तान दोन पाऊले पुढे टाकेल असे म्हणणारा बुडबुडा हवेतच फोडला. बाजवा यांनी भारताविरुद्ध नेहमीप्रमाणे गरळ ओकली.
मुंबई - पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी भारताला उघडपणे धमकी दिली होती. भारतीय सैन्यांनी पाकिस्तानी सैनिकांच्या सांडलेल्या रक्ताचा बदला घेणार, असे चिथावणीखोर वक्तव्य कमर बाजवा यांनी केले होते. बाजवा यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेने समाचार घेतला आहे. सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. 56 इंच निधड्या छातीचे कमर बाजवा यांचा बाजा वाजवणार का ? असा प्रश्न उद्धव यांनी सामनातून विचारला आहे.
पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी हा पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा भारतासाठी पाकिस्तान दोन पाऊले पुढे टाकेल असे म्हणणारा बुडबुडा हवेतच फोडला. बाजवा यांनी भारताविरुद्ध नेहमीप्रमाणे गरळ ओकली. ‘सीमेवर जे रक्त सांडले आहे आणि सांडत आहे त्याचा पुरेपूर बदला पाकिस्तान घेईल’, अशी दर्पोक्ती बाजवा यांनी केली आहे. तेवढ्यावरच त्यांची वळवळ न थांबता. कश्मीरमधील जनतेला आपला ‘सलाम’ असून कश्मिरी जनता खंबीरपणे भारताविरुद्ध लढा देत आहे. याचा आपल्याला अभिमान वाटतो, असेही ‘चाँदतारे’ या महाशयांनी तोडले.
पाकिस्तानच्या या 'अरे' ला आपण ‘का रे’ कधी करणार आहोत? भारताशी एक हजार वर्षं युद्ध करावे लागले तरी ते करू, असे म्हणणाऱ्या त्या देशाच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो असोत, त्यांचे वडील झुल्फिकार अली भुत्तो असोत, त्यांना फासावर लटकवून पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झालेले झिया उल हक असोत किंवा ‘कारगील’ घडविणारे जनरल मुशर्रफ. पाकिस्तानच्या सर्वच लष्करप्रमुखांनी भारताच्या मुळावरच घाव घालण्याचे उद्योग केले. तर पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख कमर बाजवा हे त्याच विखारी आणि विषारी परंपरेचे पाईक आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा इतिहासच नव्हे, तर भूगोलही बदलण्याचा निर्धार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पाकडे लष्करशहा आणि राज्यकर्ते हिंदुस्थानचा बदला घेण्याच्या जाहीर धमक्या देतच राहणार. कमर बाजवा तेच करीत आहेत. त्यांचा ‘बाजा’ वाजवा. 56 इंची निधड्या छातीचा दावा करणारे तो वाजवणार का? असा सवाल सामनातून मोदींना विचारण्यात आला आहे.