"उद्धव ठाकरेंनी भाजपचा विश्वासघात केला", अमित शाहांचा हल्लाबोल; म्हणाले, शिंदे नाराज होण्याचे कारण नाही..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 23:01 IST2024-12-14T22:58:59+5:302024-12-14T23:01:48+5:30
महाराष्ट्राच्या निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

"उद्धव ठाकरेंनी भाजपचा विश्वासघात केला", अमित शाहांचा हल्लाबोल; म्हणाले, शिंदे नाराज होण्याचे कारण नाही..
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपचा विश्वासघात केला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याच्या लालसेपोटी हे सर्व केले, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले.
अमित शाहांना विचारण्यात आले की, एकनाथ शिंदे नाराज आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, एकनाथ शिंदे हे नाराज होण्याचे कारण नाही. भाजपला जास्त जागा मिळाल्या होत्या, तरीही आम्ही एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री केले आणि या काळात भाजप पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिला.
महाराष्ट्राच्या निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अमित शाह यांनी सांगितले. तसेच, महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला जाणार, हे आधीच ठरले होते. महाराष्ट्र निवडणुकीत आम्हाला जास्त जागा मिळाल्या, त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्री आमचाच होईल. कारण, जास्त जागा असूनही आम्ही एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले होते, असे अमित शाह म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सर्वोच्च न्यायालयाने ३० जून २०२२ रोजी फ्लोअर टेस्टबाबत मोठा निर्णय दिला होता, मात्र, फ्लोअर टेस्टपूर्वीच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने फ्लोअर टेस्टचा निकाल जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत म्हटले होते की, फ्लोअर टेस्टशी माझा काहीही संबंध नाही. मी मुख्यमंत्रीपद सोडत आहे. तसेच, माझ्याकडे शिवसेना असून ती माझ्याकडून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही, असेही ठाकरे म्हणाले होते.