तोगडियांचे अश्रू हिमतीचे की भीतीचे? - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 07:48 AM2018-01-18T07:48:10+5:302018-01-18T07:50:40+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांवर टीका केली आहे.
मुंबई - विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी काही लोकांनी आपली मुस्कटदाबी करण्याचा व पोलीस चकमकीत आपल्याला ठार मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला; परंतु कोणत्याही धमक्या व दडपणाला बळी न पडता आपण हिंदूंच्या व शेतक-यांच्या हितासाठी आवाज उठवतच राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या घटनेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांवर टीका केली आहे.
''आणीबाणीत राजकीय विरोधकांना ‘पंगू’ करण्यासाठी शासन यंत्रणेने गुंडगिरी केली व त्यास इंदिराजींचे बळ मिळाले, पण हिंदुस्थानात आता हिंदुत्ववाद्यांनाच भय व दहशत वाटत असेल तर मोदी व शहा यांनी पुढे येऊन खुलासा करायला हवा. नवी राजवट आल्यापासून लालकृष्ण आडवाणींसह अनेकांची ‘वाचा’ गेली आहे. हे भय आहे की मौन आहे हादेखील एक प्रश्न आहेच, पण प्रवीण तोगडियांनी जे घडले त्यास ‘वाचा’ फोडली आहे. मात्र त्यांचे अश्रू हिमतीचे नसून भीतीचे आहेत. देश भयाच्या सावटाखाली आहे काय?'', असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय?
सर्वोच्च न्यायालयातील चार ज्येष्ठ न्यायमूर्तींनी गेल्या आठवड्यात देशासमोर मन की बात मांडली. त्या धक्क्यातून लोक अद्यापि सावरलेले नाहीत. तोच विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी अश्रू ढाळत अस्वस्थ मनाने विस्फोट केले आहेत. ‘माझ्या एन्काऊंटरचा डाव होता, पण ईश्वरीकृपेने मी बचावलो आहे,’ असे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकारी अध्यक्षांनी ‘मीडिया’समोर येऊन सांगितले. तोगडिया यांनी मोदी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. चार न्यायमूर्ती त्यांची घुसमट व न्याय व्यवस्थेतील हस्तक्षेपाचा पर्दाफाश करण्यासाठी लोकांसमोर आले तेव्हा त्यांना काँग्रेसचे एजंट व राष्ट्रविरोधी ठरविण्याचा प्रचार सुरू झाला. तो अद्यापि थांबलेला नाही. त्यामुळे प्रवीण तोगडिया यांना कोणती ‘उपाधी’ बहाल होते तेच आता पाहायचे. शिवसेना ही एक प्रखर हिंदुत्ववादी संघटना आहे व हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आमची तलवार नेहमीच सज्ज असते. हिंदुत्वाच्या लढाया आम्ही गनिमी पद्धतीने कधीच लढलो नाही. आमच्यासाठी हिंदुत्व हा खेळ किंवा राजकारण नसून ‘राष्ट्रधर्म’ आहे. त्यामुळे दुर्गाडी किल्ल्याच्या लढाईपासून ते बाबरी प्रकरणानंतर मुंबईत उद्भवलेल्या दंगलींपर्यंत शिवसेना परिणामांची पर्वा न करता लढली आहे, पण इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या बाबतीत असे छातीठोकपणे म्हणता येईल काय? हिंदुत्वाकरिता लढण्यासाठी शिवसेनेने राजकीय उपवस्त्र (पोटशाखा) निर्माण केली नाहीत. शिवसेना स्वतःच लढत राहिली. सत्तेचा व दहशतीचा वापर करून शिवसेनेचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न अनेकदा झाला, पण आपला आवाज दाबणाऱयांच्या नरडीचा घोट घेऊन शिवसेनेचा वाघ गर्जना करीत असतो. त्यामुळे श्री. तोगडिया यांनी ढाळलेल्या अश्रूंची व व्यथेची आम्हाला चिंता वाटते.
तोगडिया व मोदी यांचा उल्लेख त्यांचे समर्थक हिंदुहृदयसम्राट वगैरे करीत असतात, पण तोगडियांनी काल अश्रू ढाळले व मोदीही अधूनमधून अश्रूंना वाट करून देत असतात. मात्र देशाच्या दोन हिंदुहृदयसम्राटांनी म्हणजे वीर सावरकर व बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच अश्रू ढाळून मनाचा कमकुवतपणा दाखवला नाही. व्यासपीठावरून एरव्ही गर्जना करणारा तोगडियांसारखा नेता जेव्हा मुळापासून हादरलेला दिसतो तेव्हा आश्चर्य वाटते. गेल्या काही वर्षांपासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे तोगडिया यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून त्रास दिला जात आहे व आवाज दाबण्यासाठी देशभरात खटले दाखल केले जात असल्याचे तोगडिया सांगत आहेत. हे सर्व राजकीय दबावाने सुरू आहे असे ते म्हणत आहेत. तथापि देशात व गुजरातमध्ये हिंदुत्ववादी मोदी सरकारचे राज्य आहे हे त्यांनी विसरू नये. गुजरातमध्ये हिंदुत्वाची ठिणगी ‘साबरमती’ एक्सप्रेसच्या भडकलेल्या ज्वालेतून निघाली व त्यानंतर गुजरातमध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली जे घडले त्यामागचे सूत्रधार स्वतः तोगडिया होते, पण आता त्याच तोगडियांवर गुजरातमध्ये अश्रू ढाळण्याची वेळ यावी हे भयंकर आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी राजस्थान पोलिसांचे पथक तोगडियांना अटक करण्यासाठी घरी गेले. त्या वेळी ते पूजा करीत होते. ‘एक माणूस माझ्याकडे धावत आला व त्याने मला सांगितले की, तुम्ही आताच्या आता कार्यालय सोडा, तुम्हाला ताब्यात घेऊन तुमचे एन्काऊंटर करण्यासाठी लोक निघाले आहेत.’ राजस्थानचे पोलीस येत आहेत असे समजताच तोगडिया यांनी राजस्थानचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा आम्ही कोणत्याही प्रकारच्या पोलिसांना गुजरातला पाठवले नसल्याचे या दोघांनी सांगितले. त्यानंतर तोगडिया हे घराबाहेर पडले व नंतर बेपत्ता झाले. बेशुद्ध अवस्थेत सापडले. हे सर्व प्रकरण म्हणूनच धक्कादायक व विचित्र वाटत आहे. तोगडिया हे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. ते कुणी सोमेगोमे नाहीत.
त्यांच्या अटकेसाठी राजस्थानचे पोलीस येतात व गुजरात पोलिसांना त्याची खबर नसावी हे संशयास्पद आहे. अशा कारवाईची राजस्थानच्या गृहमंत्र्यांनादेखील माहिती नव्हती. मग पोलिसांच्या गणवेशातले मारेकरी तोगडियांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत होते काय, अशीही शंका व्यक्त होऊ शकते. त्यात तोगडियांचा हा सगळा ‘बनाव’ आहे, असा आक्षेप घेण्यात येत आहे. त्याला पूरक असा प्रतिवाद, मुद्दे आणि पुरावेदेखील सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यामुळे या एकूणच प्रकरणाचे गूढ वाढले आहे. अर्थात ते तसेच राहणे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. कारण या सर्व प्रकरणाचे खापर आता मोदी-शहांवर फोडले जात आहे आणि विरोधकांना कोलीत मिळाले आहे. देशात सध्या अनेक प्रकरणांनी अचानक उचल खाल्ली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन वादळ निर्माण केले आहे. न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूने अमित शहांना ‘कटघऱ्या’त उभे केले आहे. एका जबरदस्त तणावाखाली लोया यांच्या मुलाने पत्रकार परिषद घेतली. तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. सोहोराबुद्दीन हत्या प्रकरणातही राजस्थानचेच पोलीस गुजरातमध्ये घुसले होते, पण प्रवीण तोगडिया म्हणजे सोहोराबुद्दीन नाहीत हे विसरता येणार नाही. नको असलेली माणसे ‘गायब’ करण्याचे प्रकार रशिया व चीनच्या कम्युनिस्ट राजवटीत घडले आहेत. कदाचित पाकिस्तान, इराकमध्येही घडले असतील. आणीबाणीत राजकीय विरोधकांना ‘पंगू’ करण्यासाठी शासन यंत्रणेने गुंडगिरी केली व त्यास इंदिराजींचे बळ मिळाले, पण हिंदुस्थानात आता हिंदुत्ववाद्यांनाच भय व दहशत वाटत असेल तर मोदी व शहा यांनी पुढे येऊन खुलासा करायला हवा. नवी राजवट आल्यापासून लालकृष्ण आडवाणींसह अनेकांची ‘वाचा’ गेली आहे. हे भय आहे की मौन आहे हादेखील एक प्रश्न आहेच, पण प्रवीण तोगडियांनी जे घडले त्यास ‘वाचा’ फोडली आहे. मात्र त्यांचे अश्रू हिमतीचे नसून भीतीचे आहेत. देश भयाच्या सावटाखाली आहे काय?