जनतेच्या तोंडास पाने पुसणारा ‘मोदी-वृक्ष’, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 07:34 AM2018-11-10T07:34:53+5:302018-11-10T07:47:05+5:30
Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर निर्माणावरुन सध्या राजकारण चांगलंच तापू लागले आहे. या मुद्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.
मुंबई - अयोध्येतील राम मंदिर निर्माणावरुन सध्या राजकारण चांगलंच तापू लागले आहे. या मुद्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर रामाची भव्य मूर्ती बनविणार असल्याची घोषणा केली. यावरुनच सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल चढवला आहे. ''इंडोनेशिया, मॉरिशससारख्या देशांत, नेपाळात राममंदिरे भव्य मूर्तीसह उभी आहेत. त्यामुळे रामाची एक मोठी पुतळावजा मूर्ती उभी करून तुम्ही कोणत्या झाडाची पाने हिंदूंच्या तोंडास पुसत आहात. आम्हास बोधीवृक्ष माहीत होता, पण आता जनतेच्या तोंडास पाने पुसण्याचा जो ‘मोदी-वृक्ष’ निर्माण झाला आहे त्या झाडाची पाने पाचोळ्यासारखी अयोध्येतही उडू लागली आहेत'', अशा बोचऱ्या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे.
(अयोध्येत रामाची भव्य मूर्ती उभारणार : योगी)
सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे
-आता राममंदिराचा विषय बाजूला ठेवून अयोध्येत श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. सरकार बहुतेक सर्वच पातळ्यांवर नालायक ठरल्याने पुन्हा अयोध्येचा विषय हाती घेऊन लोकांना भ्रमित करण्याचे ठरवलेले दिसते.
- योगी दीपोत्सवाच्या सोहोळ्यांसाठी अयोध्येत गेले व त्यांनी दोन-तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. अयोध्येत 200 मीटर उंचीचा श्रीरामांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा त्यांनी केली. हा पुतळा सरदार पटेलांच्या पुतळ्यापेक्षा मोठा आहे की लहान हे अद्यापि ठरायचे आहे. योगी महाराजांनी आणखी एक घोषणा केली ती म्हणजे फैजाबादचे नामकरण त्यांनी ‘अयोध्या’ असे केले. फैजाबाद हा जिल्हा आहे व त्यातच रामाची अयोध्या नगरी वसली आहे.
- अलाहाबादचे प्रयागतीर्थ त्यांनी मागच्याच आठवडय़ात केले, पण शहीद झालेल्या शेकडो कारसेवकांची मागणी होती राममंदिर उभारण्याची, सरकारने मात्र दिला पुतळा व फैजाबादचे नामकरण. उद्याच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपतर्फे दिलेला हा ‘लॉलीपॉप’ आहे. हा लॉलीपॉप चघळत बसा व पुन्हा एकदा रामाच्या नावावर मतदान करा, असेच हिंदुत्ववाद्यांना सांगण्यात आले आहे.
- श्रीरामाचे पुतळे व मूर्ती या जगभरात भरपूर आहेत. इंडोनेशिया, मॉरिशससारख्या देशांत, नेपाळात राममंदिरे भव्य मूर्तीसह उभी आहेत. त्यामुळे रामाची एक मोठी पुतळावजा मूर्ती उभी करून तुम्ही कोणत्या झाडाची पाने हिंदूंच्या तोंडास पुसत आहात. आम्हास बोधीवृक्ष माहीत होता, पण आता जनतेच्या तोंडास पाने पुसण्याचा जो ‘मोदी-वृक्ष’ निर्माण झाला आहे त्या झाडाची पाने पाचोळ्यासारखी अयोध्येतही उडू लागली आहेत.
- निवडणुकांसाठी ‘राममंदिर’ पुन्हा जुमल्यांसारखे वापरणार असाल तर हिंदुत्वास खांदा देण्याची वेळ येईल. त्यामुळे राममंदिर बाजूला ठेवून पुतळ्याचे लॉलीपॉप दाखविणाऱ्यांपासून हिंदूंनी सावध राहावे!
- 25 नोव्हेंबरला आम्ही अयोध्येत पोहोचत आहोतच, पण नेमके त्याच दिवशी भाजपने अयोध्येत राममंदिरासाठी म्हणे संत संमेलन आयोजित केले. हा योगायोग समजायचा की आणखी काही? अर्थात राममंदिरासाठी सगळ्यांचेच सहकार्य आणि आशीर्वाद हवे आहेत. त्यामुळे संतांनी, महंतांनी मंचावरून मैदानात उतरावं हीच रामभक्तांची अपेक्षा आहे!