...तेव्हा युतीसंदर्भात उद्धव ठाकरेंची मोदींसोबत तासभर चर्चा, बंडखोर खासदाराने स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 07:04 PM2022-07-19T19:04:22+5:302022-07-19T19:05:16+5:30
लोकसभेतील शिवसेनेच्या 12 खासदारांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेला खासदारांनी पाठिंबा दर्शवला.
नवी दिल्ली/मुंबई - शिवसेना पक्षात मोठी फूट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर पाहायला मिळालं. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले तर देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर, आता 12 शिवसेना खासदारांचाही गट एकनाथ शिंदे गटात सहभागी होत आहे. राजधानी दिल्लीत आज एकनाथ शिंदेंनी 12 खासदारांची भेट घेतली. त्यानंतर, 12 खासदारांनी शिंदेगटाला आपला पाठिंबा जाहीर केल्याचं एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तसेच, राहुल शेवाळे यांनी लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड केल्याचंही ते म्हणाले. त्यानंतर, बोलताना खासदार शेवाळे यांनी अनेक गौप्यस्फोट केले.
मुंबईनंतर आता दिल्लीतही शिवसेनेत भूकंप झाला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या 12 खासदारांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेला खासदारांनी पाठिंबा दर्शवला. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली. या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार राहुल शेवाळे यांनी भाजप-सेना युतीसंदर्भात अनेक गौप्यस्फोट केले. उद्धव ठाकरे स्वत: भाजपासोबत युतीसाठी आग्रही होते. पण, खासदार संजय राऊत यांनी खोडा घातला असा घणाघाती आरोप राहुल शेवाळे यांनी केला. विशेष म्हणजे युतीसाठी उद्धव ठाकरे जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले होते. त्यावेळी त्यांनी तासभर चर्चाही केली होती. मात्र, पुढच्या जुलै महिन्यात भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. त्यामुळे, ही बोलणी पुढे सरकलीच नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.
"उद्धव ठाकरेंनाही भाजपासोबत युती हवी होती. त्यांनी तसं आम्हाला बैठकीत बोलून दाखवलं होतं. मी माझ्यापरीनं युतीसाठी प्रयत्न केले आहेत. आता तुम्ही तुमच्या परीनं प्रयत्न करा असं आम्हाला उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळेच आम्ही आज हा निर्णय घेतला आहे", असं राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्यास पाठींबा
"ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि आमदारांनी वेगळी भूमिका घेतली त्यावेळी आम्हा सर्व खासदारांना वर्षा बंगल्यावर बैठकीसाठी बोलावलं होतं. २१ जून रोजी ही बैठक झाली होती. तेव्हाही आम्ही आमची स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यावेळी स्वत: उद्धव ठाकरेंनी जर एकनाथ शिंदे यांना भाजपानं मुख्यमंत्री केलं तर नक्कीच मी तुमच्या भूमिकेचं स्वागत करेन आणि युती करू असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळेच आम्ही तेव्हा तयार झालो. या बैठकीला तेव्हा संजय राऊत, अरविंद सावंत आणि इतरही खासदार उपस्थित होते", असा गौप्यस्फोटही शेवाळे यांनी यावेळी केला.
उद्धव ठाकरेंनी जून महिन्यात घेतली होती मोदींची भेट
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जून 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीमध्ये राज्याशी संबंधित विविध विषयांबरोबरच मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या भेटीचे काही राजकीय अर्थदेखिल काढण्याचा प्रयत्न झाला होता. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनीही या भेटीवर बोलताना उद्धव ठाकरेंनी केलेली राजकीय तडजोड असल्याचे थेट म्हटले होते. आता, पुन्हा एकदा त्या भेटीची चर्चा होत आहे.