"उद्धव ठाकरे यांनीही गुवाहाटीत यावं अन्...", आसामच्या मुख्यमंत्र्यांनी डिवचलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 05:35 PM2022-06-24T17:35:31+5:302022-06-24T17:39:50+5:30
Assam CM : उद्धव ठाकरे यांनाही गुवाहाटीत यावे, असे सांगत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी डिवचले आहे.
नवी दिल्ली : आसामची राजधानी गुवाहाटी हे सध्या महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार आसाममधील गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. यातच आता उद्धव ठाकरे यांनाही गुवाहाटीत यावे, असे सांगत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी डिवचले आहे.
एकनाथ शिंदे गटाच्या सर्व महत्वाच्या बैठका आणि महत्वाचे निर्णय गुवाहाटीमधून घेतले जात आहेत. त्यामुळे आसाममध्ये एकीकडे पुरस्थिती असताना सर्वांचे लक्ष गुवाहाटीतील एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांकडे आहे. याविरोधात गुरूवारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलसमोर आंदोलन केले. तसेच, महाराष्ट्रातील आमदारानी परत जावे, अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. मात्र, याला आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आसामध्ये येण्यापासून मी कुणालाही रोखू शकत नाही. तुम्ही हॉटेलमध्ये बुकिंग केले तर मी तुम्हाला येऊ नका, असे कसे सांगू शकतो. देशात सर्वत्र फिरण्याचा, राहण्याचा नागरिकांना अधिकार आहे, असे हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले. तसेच, मी देशातील सर्व आमदारांना आसाममध्ये येण्याचे निमंत्रण देतो. महाराष्ट्रात कधी सरकार स्थापन होईल, माहीत नाही. पण ते (आमदार) जितके दिवस राहतील, तितके दिवस माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. उद्धव ठाकरे यांनाही सुट्टीसाठी यावे, असेही हिमंत बिस्वा सरमा म्हणाले.
आमदारांची उपस्थिती राज्याला चुकीचा संदेश देत आहे -भूपेन कुमार बोराह
या सर्व घडोमोडीत आता आसाम कॉंग्रेसचे प्रमख भूपेन कुमार बोराह यांनी महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहीत लवकरात लवकर आसाम सोडण्याचे आवाहन केले आहे. राज्याच्या हितासाठी आसाम कॉंग्रेसने एकनाथ शिंदेंना आसाम सोडण्याचे आवाहन केले आहे. आसाममधील लोक नैतिकतेला महत्त्व देतात. महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांसह गुवाहाटीमध्ये तुमची उपस्थिती राज्याला चुकीचा संदेश देत आहे, असे बोरा यांनी पत्रात म्हटले आहे.