हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्यास ठाकरे,पवारांची अनुपस्थिती ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 11:21 AM2019-12-29T11:21:32+5:302019-12-29T11:23:47+5:30
झारखंडमध्ये होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यानिमित्ताने विरोधी पक्षांकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
झारखंड: झारखंडमध्ये जेएमएम, काँग्रेस आणि आरजेडी युतीला बहुमत मिळाल्यानंतर आज दुपारी हेमंत सोरेन झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामुळे या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच नाव सुद्धा या यादीमध्ये समाविष्ट आहे. मात्र उद्धव ठाकरे हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार नाही.
हेमंत सोरेन यांनी उद्धव ठाकरे यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्यास न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आज तक या वृत्तवाहिनीने दिले आहे. तर झारखंडमध्ये होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यानिमित्ताने विरोधी पक्षांकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या शपथविधी सोहळ्यास उपस्थित न राहण्याचे निर्णय घेतला असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
तर उद्धव ठाकरेप्रमाणेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा या शपथविधी सोहळ्यास जाणार नाहीत. शरद पवार यांचा आज पनवेलमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम असून, तिथे ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थिती नसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.