उद्धव ठाकरेंनी एनडीएसोबत यावं, 80 टक्के खासदार नाराज - दीपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 12:38 PM2022-07-13T12:38:15+5:302022-07-13T12:39:48+5:30
Deepak Kesarkar: बुधवारी दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून दिल्लीत आलो आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएने (NDA) आयोजित केलेल्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाला देण्यात आले आहे. त्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) दिल्लीत दाखल झाले आहेत. आज गुरुपौर्णिमा आहे. माझे गुरु बाळासाहेब ठाकरे आहेत. हिंदुत्वाचा विचार घेऊन चालणे, हीच त्यांना गुरुदक्षिणा आहे, असे म्हणत दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एनडीएसोबत येण्याचे आवाहन केले आहे.
बुधवारी दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून दिल्लीत आलो आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, उद्धव ठाकरे यांना मी विनंती करतो की, त्यांनी एनडीएमध्ये यावे. कारण, जवळपास शिवसेनेचे 80 टक्के खासदार नाराज आहेत. हे सर्व खासदार हिंदुत्वाचा मार्ग सोडणार नाहीत, असे दीपक केसरकर म्हणाले. याशिवाय, आम्ही एका विचाराने पुढे जात आहोत. हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात आहोत. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
याचबरोबर, दीपक केसरकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी संजय राऊत हे शरीराने शिवसेनेत पण मनाने राष्ट्रवादीत आहेत, असा टोला लगावला. तर पवारसाहेब म्हणतात दोन पण आमदार निवडून येणार नाही. पण त्यांनी भूतकाळात रमून चालणार नाही, असे प्रत्युत्तर दीपक केसरकर यांनी शरद पवार यांना दिले. तसेच, शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोपही दीपक केसरकर यांनी केला आहे.