'उद्धव ठाकरेंनी 'अयोध्या'ऐवजी मक्केला जावे, श्रीरामांच्या दर्शनालाही विरोध'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 10:54 AM2020-03-04T10:54:49+5:302020-03-04T11:03:08+5:30
देशाला हिंदूराष्ट्र बनवायचं स्वप्न दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलं होतं.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा निकाल लागल्यानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. महाविकास आघाडी सरकारला 100 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन अयोध्या दौऱ्याची माहिती दिली. अयोध्ये हे माझ्या श्रद्धेचं स्थान असून येत्या 7 मार्चला मी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, अयोध्येतील महंतांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरुन त्यांच्यावर टीका केली.
'शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या हव्यासापोटी काँग्रेससोबत हातमिळवणी करीत राम भक्तांना धोका दिलाय. त्यामुळे, श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असे अयोध्यातील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येण्याऐवजी मक्केला जावे, असा खोचक टोलाही या महंतांनी लगावला. तर, मी स्वत: उद्धव ठाकरेंचा रस्ता रोखणार, असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाला हिंदूराष्ट्र बनवायचं स्वप्न दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलं होतं. जगात हिंदूंचा स्वत:चा कोणताही देश नाही, म्हणून हिंदूराष्ट्रासाठी बाळासाहेब आग्रही होते. त्यामुळेच, आम्ही कधीच शिवसेनेला काँग्रेस होऊ देणार नाही, असेही बाळासाहेबांनी ठणकावून सांगितलं होतं. मात्र, सत्तेच्या हव्यासासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत हातमिळवणी केली, असे परमहंस दास यांनी म्हटलंय.
दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नव्हता, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर पडला होता. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर अनेक राजकीय उलथापालथ घडल्याचे दिसून आलं. त्यामुळे राज्यात नवे सरकार स्थापन होण्यास विलंब झाला. या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महाय़ुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाल्याने शिवसेनेने भाजपाची साथ सोडली आणि राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं.
गतवर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले होते. तसेच अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर रोजी दिला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. हा दौरा 24 नोव्हेंबर रोजी नियोजित होता. मात्र. राज्यात सत्तास्थापनेस विलंब होत असल्याने हा दौरा लांबणीवर पडला होता.