'...तेव्हा हुकूमशाहचा अंत होतो, अब की बार भाजपा तडीपार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंचा हुंकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 08:52 PM2024-03-17T20:52:03+5:302024-03-17T20:52:47+5:30
Uddhav Thackeray criticize Narendra Modi: जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा हुकूमशाहचा अंत होतो. मी एक घोषणा नेहमीच देत असतो ती म्हणजे अब की बार भाजपा तडीपार, त्याची सुरुवात आजपासून झाली आहे. शिवतीर्थावरून जेव्हा रणशिंग फुंकलं जातं तेव्हा संपूर्ण देश त्या मार्गावरून चालतो, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि नरेंद्र मोदींना आव्हान दिलं.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे झाली. यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर घणाघाती टीका केली. आम्ही जी लढाई लढतोय ती लोकशाही आणि घटनेला वाचवण्यासाठीची लढाई आहे. भाजपाला घटना बदलण्यासाठीच ४०० पार जायचं आहे. मात्र जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा हुकूमशाहचा अंत होतो. मी एक घोषणा नेहमीच देत असतो ती म्हणजे अब की बार भाजपा तडीपार, त्याची सुरुवात आजपासून झाली आहे. शिवतीर्थावरून जेव्हा रणशिंग फुंकलं जातं तेव्हा संपूर्ण देश त्या मार्गावरून चालतो, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि नरेंद्र मोदींना आव्हान दिलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा हा एक फुगा आहे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की. या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं. संपूर्ण देशात यांचे दोनच खासदार होते. त्या फुग्यामध्ये आम्ही हवा भरली आणि आता त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. आता मलाही विचारतात की, तुमच्या किती जागा येतील? यांना विचारलं तर म्हणतात की ४०० पार, काय ४०० पार हे काय फर्निचरचं दुकान आहे. आज देशभरातील नेते इथे आले आहेत. आज जी परिस्थिती आहे, ती महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आम्ही जी लढाई लढतोय, ती लोकशाही आणि घटनेला वाचवण्यासाठीची आहे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, कोर्टामध्ये कुठल्याही धर्मग्रंथाऐवजी घटनेवर हात ठेवून शपथ घ्यायला सुरुवात पाहिजे. पण आज भाजपाला घटना बदलायची आहे. यांना ४०० पार जागा त्याचसाठी पाहिजे आहेत. यांचे एक नेते अनंत कुमार हेगडे तसं म्हणाले आहेत. तुम्हाला माहिती असेलच सध्या रशियामध्ये निवडणुका सुरू आहेत. पण तिथे व्लादिमीर पुतीन त्यांच्याविरोधात कुणीच लढणारा नाही. जे विरोधक आहेत ते तुरुंगात किंवा परदेशात आहेत. पण मी लोकशाही मानतो, निवडणूक घेतलीय, पण विरोधात लढायलाच कुणी नाही. हे अशी सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर अशी वेळ आलीय की, मी म्हणतो देश हाच माझा धर्म, देश वाचला तर आम्ही वाचू, व्यक्तीची ओळख देश असली पाहिजे. व्यक्ती देशापेक्षा मोठं असता कामा नये. कुणीही कितीही मोठा असला तरी त्याच्यापेक्षा मोठा माझा देश आहे. हे आता मोदी सरकार अशी जाहिरात करताहेत, यांच्या डोक्यात आता देशाचं नाव बदलण्याचं स्वप्न आहे का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, या देशातील जनतेसमोर हुकूमशाहा कितीही मोठा असला तरी जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा हुकूमशाहचा अंत होतो. मी एक घोषणा नेहमीच देत असतो ती म्हणजे अब की बार भाजपा तडीपार, त्याची सुरुवात आजपासून झाली आहे. शिवतीर्थावरून जेव्हा रणशिंग फुंकलं जातं तेव्हा संपूर्ण देश त्या मार्गावरून चालतो, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि नरेंद्र मोदींना आव्हान दिलं.