अयोध्येतील प्रभावी भाषणासाठी उद्धव लागले कामाला; हिंदीची शिकवणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 10:55 AM2018-11-14T10:55:53+5:302018-11-14T10:59:17+5:30
25 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दसऱ्या मेळाव्यात अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत. राम मंदिरावरुन भाषणावर तोफ डागण्यासाठी उद्घव यांनी विशेष तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे अयोध्येत जवळपास 1 तासभर भाषण करणार आहेत. या भाषणासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदी भाषेची शिकवणी लावली आहे. अयोध्येतील भाषण प्रभावी व्हावं, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
25 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. गेल्या साडेचार वर्षांपासून शिवसेना केंद्रात सत्तेत आहे. मात्र तरीही शिवसेनेच्या नेतृत्त्वाकडून कायम मोदी सरकारवर टीका केली जाते. त्यामुळे पहिल्यांदाच हिंदी पट्ट्यात जाणारे उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात नेमकं काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मोदी आणि भाजपाला 4 वर्ष राम आठवला नाही. मात्र निवडणूक जवळ येताच त्यांना रामाची आठवण झाली, अशी टीका उद्धव यांनी दसऱ्या मेळाव्यात केली होती. यानंतर शिवसेनेकडून उद्धव यांच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू झाली. अयोध्येतील भाषण प्रभावी व्हावं, यासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदीची शिकवणी सुरू केली आहे. 'दैनिक भास्कर'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. हिंदीतील धारदार शब्दांचा वापर करुन मोदी आणि भाजपाला लक्ष्य करण्याचा उद्धव यांचा इरादा आहे.
उद्धव ठाकरे उत्तम हिंदी बोलतात, असं एका वरिष्ठ शिवसेना नेत्यानं सांगितलं. मात्र अयोध्येत संपूर्ण भाषण हिंदीत करायचं असल्यानं ते धारदार करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे, असं या नेत्यानं खासगीत बोलताना सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख पत्रकार परिषदेत हिंदीत बोलतात. हिंदी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांना ते हिंदीत उत्तरंदेखील देतात. मात्र त्यांनी अद्याप हिंदीत भाषण केलेलं नाही. अयोध्येतल्या त्यांच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असल्यानं उद्धव यांनी त्यासाठी विशेष मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे.