कॉलेजमध्ये शिक्षणासोबत मिळणार नोकरी आणि पैसे; UGC नं तयार केला जबरदस्त प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 12:06 PM2024-10-11T12:06:07+5:302024-10-11T12:08:27+5:30
विद्यापीठ अनुदान आयोग जानेवारी-फेब्रुवारी २०२५ पासून अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (AEDP) अभ्यासक्रम सुरू करणार आहे.
नवी दिल्ली - विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) पदवीधर विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करणार आहे. या उपक्रमाद्वारे विद्यापीठ विद्यार्थ्यांना ३ किंवा ४ वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी इंडस्ट्री बेस्ड ट्रेनिंगसह स्टायपेंड देईल. UGC अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (AEDP) सुरू करणार आहे जेणेकरुन पदवीधर पातळीवर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता त्यांना व्यावहारिक उद्योग अनुभव देऊन वाढवता येईल.
UGC चा अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (AEDP) कोर्स जानेवारी-फेब्रुवारी २०२५ पासून सुरू केला जाऊ शकतो. यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांनी सांगितले की, अप्रेंटिसशिप एम्बेडेड पदवी कार्यक्रम मंजूर झाला आहे. पदवीच्या काळात विद्यार्थ्यांना रोजगारासाठी तयार करणे हा त्याचा उद्देश आहे. हा अभ्यासक्रम सेमिस्टर प्रशिक्षणावर आधारित असेल. यूजीसीने या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार केला आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार स्टायपेंड
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) मध्ये टॉप २०० मध्ये स्थान मिळालेले कोणतेही विद्यापीठ हा अभ्यासक्रम सुरू करू शकते. उद्योगाशी थेट भागीदारी करून अभ्यासक्रम सुरू केल्यास कंपन्या तरुणांना स्टायपेंड देईल, तर नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) पोर्टलद्वारे नोंदणी केल्यावर सरकारकडून स्टायपेंड दिला जाईल.
३ ऑक्टोबर रोजी UGC च्या बैठकीत घेतलेल्या आढाव्यानुसार, तयार केलेली मार्गदर्शक तत्त्वे लवकरच UGC वेबसाइटवर सार्वजनिक करणार असून त्यातून लोकांकडून अभिप्राय मागवले जातील. यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम जगदीश कुमार यांनी देशातील विद्यापीठांना UGC च्या अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (AEDP) मध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे.
कसा आहे मसूदा?
मसुद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अप्रेंटिसशिप सहामाही परीक्षेपासून शुरू होऊ शकते. जी पदवी कालावधीच्या ५० टक्के असू शकते. नियमित शिकाऊ उमेदवारीसाठी किमान एक सेमिस्टर आवश्यक आहे. नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कशी जोडलेल्या प्रणालीत प्रशिक्षणात घालवलेल्या तासांच्या संख्येवर आधारित क्रेडिट्स दिले जातात. प्रशिक्षणार्थीचे एक पूर्ण वर्ष किमान ४० क्रेडिट्सच्या बरोबरीचे असते. जर हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असेल, तर विद्यार्थ्यांना किमान एक सेमिस्टर आणि जास्तीत जास्त तीन सेमिस्टरसाठी उद्योगांच्या सहकार्याने प्रशिक्षण घ्यावे लागेल. जर हा चार वर्षांचा अभ्यासक्रम असेल तर किमान २ आणि जास्तीत जास्त ४ सेमिस्टरसाठी प्रशिक्षण दिले जाईल.