डार्कनेटवर फुटले हाेते ‘यूजीसी-नेट’चे पेपर : शिक्षणमंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 10:46 AM2024-06-21T10:46:15+5:302024-06-21T10:46:41+5:30

समुपदेशन रद्द करण्यास सर्वाेच्च न्यायालयाने दिला नकार .

UGC NET papers leaked on darknet Education Ministers claim | डार्कनेटवर फुटले हाेते ‘यूजीसी-नेट’चे पेपर : शिक्षणमंत्र्यांचा दावा

डार्कनेटवर फुटले हाेते ‘यूजीसी-नेट’चे पेपर : शिक्षणमंत्र्यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा ‘नीट-यूजी’ २०२४ नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी जाेर धरत असताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही शक्यता फेटाळून लावली. ‘नीट’ परीक्षेबाबतच्या घटना काही ठराविक प्रदेशापुरत्या मर्यादित असून लाखाे विद्यार्थ्यांनी याेग्य प्रकारे परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांना फटका बसायला नकाे, अशी भूमिका प्रधान यांनी स्पष्ट केली. तसेच ‘यूजीसी-नेट’ परीक्षेचे पेपर डार्कनेटवर फुटले हाेते. त्यामुळेच परीक्षा रद्द करण्यात आली, असे प्रधान यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘नीट-यूजी’ २०२४ परीक्षा रद्द करा आणि अनियमिततेची चौकशी करा, या मागण्या करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकार, ‘एनटीए’ आणि इतरांकडून उत्तर मागितले. 

पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र जारी
एनटीएने नीट-यूजी २०२४ पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. वेळेच्या कमतरतेमुळे सवलतीचे गुण मिळालेल्या १५६३ उमेदवारांसाठी ही परीक्षा घेतली जात आहे. परंतु पुन्हा परीक्षा द्यायची की नाही किंवा वाढीव गुण काढून टाकल्यानंतर शिल्लक राहिलेल्या गुणांसह पुढे जायचे हे उमेदवारांवर सोडण्यात आले आहे.  नीट पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. २३ जून रोजी दुपारी २ ते ५.२० या वेळेत ही परीक्षा होणार आहे. तिचा निकाल ३० जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मानसिकदृष्ट्या खचले आहेत आणि सरकार चालवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागेल. ते रशिया - युक्रेन युद्ध थांबवतील, पण पेपरफुटी थांबवू शकत नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत? भाजप आणि त्याच्या मातृ संघटनेशी संबंधित लोकांनी शैक्षणिक संस्था काबीज केल्या आहेत. ही परिस्थिती बदलल्याशिवाय पेपरफुटी थांबणार नाही. संसदेच्या आगामी अधिवेशनात विरोधी पक्ष पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित करील.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते

समुपदेशन रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला. नीट-यूजी २०२४ संबंधी इतर प्रलंबित प्रकरणांसह याचिकांवर ८ जुलै रोजी सुनावणी केली जाईल, असे सांगत खंडपीठाने समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती देत नसल्याचे स्पष्ट केले.
 

Web Title: UGC NET papers leaked on darknet Education Ministers claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.