UGC PhD Rules: 4 वर्षांच्या ग्रॅज्युएशननंतर विद्यार्थ्यांना थेट Phd करता येणार, यूजीसी अध्यक्षांची मोठी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 08:43 PM2022-12-14T20:43:15+5:302022-12-14T21:01:42+5:30
UGC PhD Rules: नवीन अभ्यासक्रम पूर्णपणे लागू होईपर्यंत तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू राहील.
UGC PhD Rules: नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीमुळे, पीएचडीचे स्वप्न पाहणाऱ्या पदवीधरांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाबाबत काळजी करण्याची गरज नाही. पीएचडीसंदर्भातील महत्त्वाची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देण्यात आली आहे. 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्याला थेट पीएचडी करता येणार आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी बुधवारी ही महत्वाची माहिती दिली.
यूजीसीच्या अध्यक्षांनी म्हटले की, 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पीएचडी करता येईल. तसेच, हा नवीन अभ्यासक्रम पूर्णपणे लागू होईपर्यंत तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम बंद केला जाणार नाही. UGC दीर्घकाळापासून पदवीपूर्व कार्यक्रमांसाठी नवीन अभ्यासक्रम आणि क्रेडिट फ्रेमवर्क तयार करण्याच्या विचारात होते.
Students with four-year undergraduate degree can directly pursue Ph.D programmes: UGC chairman Jagadesh Kumar
— Press Trust of India (@PTI_News) December 14, 2022
UGC FYUP जारी
UGC ने जारी केलेला नवीन अभ्यासक्रम NEP 2020 वर आधारित आहे. याअंतर्गत नियमांमध्ये लवचिकता येणार असून विद्यार्थ्यांनाही पूर्वीपेक्षा अधिक सुविधा मिळणार आहेत. ज्याअंतर्गत आता चार वर्षांचा पदवीपूर्व शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना पीएचडी करता येणार आहे. त्यांना पदव्युत्तर पदवी कार्यक्रमात प्रवेश घेण्याची गरज नाही. चार वर्षांची पदवी उत्तीर्ण करणारा कोणताही विद्यार्थी थेट पीएच.डी.साठी पात्र असेल.
4 वर्षांच्या पदवीचे फायदे
देशातील सर्व 45 केंद्रीय विद्यापीठांमध्ये पुढील सत्रापासून 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. सर्व केंद्रीय विद्यापीठांसह बहुतेक राज्यस्तरीय आणि खाजगी विद्यापीठे देखील 4 वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम देतात. याशिवाय देशभरातील अनेक डीम्ड युनिव्हर्सिटी देखील हा 4 वर्षांचा पदवीपूर्व कार्यक्रम राबविण्यास संमती देत आहेत. पदवीचे 4 वर्षे पूर्ण झाल्यावर UG ऑनर्स पदवी प्रदान केली जाईल.