सरकारची मेहनत फळाला आली, देशात १ कोटींहून अधिक मोबाइल झाले 'आधार'ला लिंक!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 07:54 PM2023-03-31T19:54:24+5:302023-03-31T20:03:02+5:30
मोबाईल क्रमांकाशी आधार लिंक करण्यासाठी भारत सरकारची मेहनत अखेर फळाला आली आहे.
मोबाईल क्रमांकाशी आधार लिंक करण्यासाठी भारत सरकारची मेहनत अखेर फळाला आली आहे. फेब्रुवारी महिन्यात १ कोटीहून अधिक मोबाईल क्रमांक 'आधार'शी लिंक करण्यात आले आहेत. खुद्द UIDAI ने शुक्रवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. UIDAI ने सांगितले की, गेल्या महिन्यात १ कोटीहून अधिक मोबाईल नंबर 'आधार'शी लिंक करण्यात आले आहेत. जानेवारीमध्ये ही संख्या ५६.७ लाख होती. म्हणजे जानेवारीपासून या महिन्यात जवळपास दुप्पट लोकांनी आपला मोबाईल नंबर लिंक केला आहे.
भारत सरकार अनेक दिवसांपासून लोकांना त्यांचे आधार मोबाईल क्रमांकाशी लिंक करण्याचे आवाहन. त्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांनी आधार लिंक केलं आहे. फेब्रुवारी महिन्यात 'आधार'शी मोबाईल क्रमांक जोडण्यात ९३ टक्के वाढ झाली आहे.
'आधार'द्वारे होणारे व्यवहारही वाढले
UIDAI च्या मते सतत प्रमोशन, सुविधा आणि विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर अपडेट ठेवण्यासाठी ही मोठी तेजी हे एक चांगलं लक्षण आहे. यासोबतच भारतात 'आधार'द्वारे होणारे व्यवहारही वाढले आहेत. केवळ फेब्रुवारी महिन्यात 'आधार'च्या माध्यमातून २२६.२९ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. जानेवारीच्या तुलनेत १३ टक्के अधिक आहे. जानेवारीमध्ये त्याची संख्या १९९.६२ कोटी होती.
आधार अनेक गोष्टींमध्ये उपयुक्त
आधार कार्डच्या वापराबद्दल बोलायचं झालं तर घर खरेदी करण्यापासून ते बँक खाते उघडण्यापर्यंत आणि सिम कार्ड मिळवण्यापर्यंत त्याचा उपयोग होतो. तसेच, तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यातही तुम्हाला आधार कार्ड आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आधार कार्ड मोबाईल नंबर आणि पॅन कार्डशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे.