आधार क्रमांक सार्वजनिक करत असाल तर सावधान! UIDAIनं दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 10:34 AM2018-08-01T10:34:17+5:302018-08-01T10:59:37+5:30

UIDAI चा नागरिकांना महत्त्वपूर्ण सल्ला

UIDAI tells people to refrain from posting Aadhaar numbers on social media | आधार क्रमांक सार्वजनिक करत असाल तर सावधान! UIDAIनं दिला सल्ला

आधार क्रमांक सार्वजनिक करत असाल तर सावधान! UIDAIनं दिला सल्ला

नवी दिल्ली - आधार क्रमांक सार्वजनिकरित्या जाहीर करणं किती धोकादायक ठरू शकते, हे  टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) चे प्रमुख आर. एस. शर्मा यांच्या 'आधार चॅलेंज'वरुन उघड झाले आहे. ट्राय प्रमुख आर.एस. शर्मा यांनी ट्विटरवर आपला आधार क्रमांक शेअर केला होता. त्यानंतर 'खासगी माहिती उघड करुन दाखवा', असे आव्हान देत आधार सुरक्षित असल्याचा दावा करणाऱ्या आर.एस.शर्मा यांच्या हे आधार चॅलेंज चांगलेच अंगलट आले. एका हॅकरनं शर्मांची खासगी माहिती काही मिनिटांतच जाहीर केली. यावरुन आधार असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, यानंतर मंगळवारी ( 31 जुलै ) UIDAI नं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन नागरिकांना आपला आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर न करण्याची सूचना दिली.

शर्मा यांच्याप्रमाणेच एक अब्जाहून अधिक भारतीयांची आधारशी निगडित व्यक्तिगत माहिती पूर्णपणे सुरक्षित आहे व ती चोरणे कोणालाही शक्य नाह, असा दावा आधार क्रमांक देणाऱ्या यूआयडीएआयनं केला होता. मात्र आता खुद्द यूआयडीएआयनं आधार क्रमांक सार्वजनिक करू नये, असा सल्ला देऊ केला आहे. 

शर्मा यांनी आधार क्रमांक ट्विटरवर जारी करुन याचा वापर करुन माझे नुकसान करुन दाखवा, असे खुले आव्हान देताच, असे धाडस करणे किती जोखमीचे आहे, हे सिद्ध करुन दाखवत, अनेकांनी त्यांचा मोबाइल फोन, पॅन क्रमांक अन्य खासगी माहिती उघड केल्याचा दावाही केला. इलियट एल्डरसन या टोपणनावाच्या फ्रेंच सुरक्षातज्ज्ञानं ट्विटर हॅंडलवर एकापाठोपाठ एक ट्विट करत सोशल मीडियावर शर्मा यांना आधार क्रमांक सार्वजनिक करणं अत्यंत जोखमीचे आहे, असा सल्ला देत, लोक तुमचा पत्ता, फोन नंबरसह इतर माहितीही मिळवू शकतात, असेही त्यांच्या निदर्शनास आणून दिले. 

आर. एस. शर्मा यांच्या आधार क्रमांकावरून इथिकल हॅकर्सनी त्यांची १४ प्रकारची माहिती लीक केली आहे. एवढेच नव्हे, त्यांच्या बँक खात्यांची माहिती मिळवून, त्यापैकी एका खात्यात आधारशी संलग्न पेमेंट सर्व्हिसमधून त्यांनी एक रुपयाही जमा केला आहे. त्यामुळे स्वत:चा आधार क्रमांक जाहीर करून, तो किती सुरक्षित आहे, असे सांगण्याचा आर. एस. शर्मा यांच्या भलताच अंगाशी आला आहे. शिवाय आधारच्या सुरक्षिततेविषयीचा दावाही पूर्णत: फोल ठरला आहे.

पंतप्रधान मोदींना आव्हान
शर्मा यांची गोपनीय माहिती उघड केल्यानंतर एल्डरसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा १२ अंकी आधार क्रमांक सार्वजनिक करण्याचे आव्हान दिले आहे. अर्थात पंतप्रधान तसे करण्याची अजिबात शक्यता आही. शर्मा यांचा डेटा हॅक झालेला नाही, त्यांची सर्वांना माहीत असलेली माहितीच दाखवून, आम्ही हा डेटा हॅक केला, असा दावा हॅकर्स करीत आहे, असे आधारने म्हटले आहे.


 




 

Web Title: UIDAI tells people to refrain from posting Aadhaar numbers on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.