‘उजाला’ने केली १७ लाख युनिटची बचत

By admin | Published: May 17, 2016 12:35 AM2016-05-17T00:35:04+5:302016-05-17T00:35:04+5:30

अलीकडच्या काळात औद्योगिकरण व आधुनिकतेचा वापर वाढल्याने विजेचाही भरमसाठ वापर वाढला आहे.

Ujala has saved 17 lakh units | ‘उजाला’ने केली १७ लाख युनिटची बचत

‘उजाला’ने केली १७ लाख युनिटची बचत

Next

रवी जवळे  चंद्रपूर
अलीकडच्या काळात औद्योगिकरण व आधुनिकतेचा वापर वाढल्याने विजेचाही भरमसाठ वापर वाढला आहे. त्या तुलनेत विजेचे उत्पादन कमी होत आहे. विजेची बचत व्हावी व कार्बन उत्सर्जन कमी व्हावे, यासाठी शासनाने उजाला योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेंतर्गत सात वॅटच्या एलईडी दिव्यांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात सध्या महिन्याकाठी १६ लाख ८५ हजार ५२० युनीट विजेची बचत होत आहे.
मागील काही दशकात जिल्ह्यात नव्हेतर संपूर्ण देशातच आधुनिकता वाढली आहे. औद्योगिक क्रांती होत आहे. सर्वत्र मनुष्यबळाऐवजी आधुनिक यंत्राचा वापर केला जात आहे. घराघरातही विजेच्या उपकरणामुळे विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. पूर्वी केवळ अंधाराचे साम्राज्य मिटविण्यासाठी विजेच्या दिव्यांचा वापर होत होता. कालांतराने विजेवर चालणारे नवनवीन यंत्र निर्माण होऊ लागले. आता कपडे धुण्यापासून ते इस्त्री करण्यापर्यंत आणि पाणी उपलब्ध करण्यापासून तर ते थंड करण्यापर्यंत विजेचा वापर केला जात आहे. याशिवाय इतर अनेक कामातही विजेचाच वापर होतो. दिवस उजाडल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनुष्याला विजेची गरज पडते. किंबहुना वीज नसली तर मानवी जनजीवनच ठप्प पडते, एवढे विजेचे महत्त्व वाढले आहे.
विजेचा वापर मर्यादेच्या पलिकडे वाढला असला तरी त्या तुलनेत विजेचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे भारनियमनासारख्या समस्याला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
या सर्व प्रकाराला आळा बसविण्यासाठी विजेची बचत आवश्यक आहे. त्यामुळे विजेची बचत व्हावी व कार्बन उत्सर्जन कमी व्हावे, यासाठी उन्नतज्योती बाय अफॉर्डेबल एलईडी फॉर आॅल (उजाला) म्हणजे सर्वांसाठी परवडणाऱ्या दरात एलईडी दिव्यांचे वितरण हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २०१५ मध्ये सुरू केला. चंद्रपूर जिल्ह्यात ही योजना जुलै २०१५ मध्ये सुरू करण्यात आली.
या उजाला योजनेंतर्गत सात वॅटचे दिवे ग्राहकाला दिले जाते. हा सात वॅटचा दिवा ६० वॅट विजेच्या दिव्याएवढा प्रकाशमान होतो, हे विशेष. संपूर्ण जिल्ह्यात असे चार लाख ४१ हजार ७२४ एलईडी बल्बचे ग्राहकांना वितरण करण्यात आले आहे.
त्यामुळे नागरिकांच्या घरात दिव्यांचा भरपूर प्रकाश होऊनही विजेची मात्र बचत होत आहे. जिल्ह्यात महिन्याकाठी १६ लाख ८५ हजार ५२० युनीटची बचत या एलईडी बल्बमुळे होत असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. यासोबत कार्बन उत्सर्जनातही जिल्ह्यात हजारो टनने कपात होत आहे.

तीन लाखांवर घरगुती ग्राहक
महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात एकूण तीन लाख १२ हजारांवर घरगुती वीज ग्राहक आहेत. या ग्राहकांकडून पूर्वी २६ हजार ५२४ किलो वॅट विजेचा वापर होत होता. मात्र चार लाख ४१ हजार ७२४ एलईडी दिव्यांच्या वितरणानंतर घरगुती ग्राहकांकडून विजेचा वापर तीन हजार ९२ किलोवॅटपर्यंत मर्यादित झाला आहे. म्हणजेच जिल्ह्यात २३ हजार ४३२ किलोवॅट विजेची बचत होत आहे.

व्यावसायिकांसाठी योजना नाही
विजेचा वापर घरगुती ग्राहकांच्या तुलनेत व्यावसायिक व उद्योजकांकडून अधिक केला जातो. मात्र शासनाकडून विजेच्या बचतीची ही योजना केवळ घरगुती ग्राहकांसाठीच राबविण्यात येत आहे. व्यावसायिकांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. तरीही काही छोटे व्यावसायिक स्वत: या एलईडी दिव्यांची खरेदी करून विजेची बचत करीत आहे.
शासनाकडून अनुदान
एलईडी दिवे हे महागडे दिवे आहेत. मात्र शासनाकडून वीज ग्राहकांना अनुदानावर ते पुरविले जाते.

योजनेमुळे वीज बिलातही दिलासा
उजाला योजनेंतर्गत एका ग्राहकाला चार एलईडी बल्बचे अनुदानावर वितरण करण्यात येते. प्रारंभी अगदी ४० रुपये देऊन हे चार दिवे मिळविता येतात. घरात केवळ सात वॅटचे दिवे जळत असल्याने महिन्याकाठी येणाऱ्या वीज बिलातही कपात होत असल्याची माहिती रुपेश मडावी या वीज ग्राहकाने लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: Ujala has saved 17 lakh units

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.