उज्वल निकम, अजय देवगण, प्रियांका चोप्रा, अनुपम खेर, श्री श्री रवीशंकर पद्मचे मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2016 03:03 PM2016-01-25T15:03:41+5:302016-01-25T22:51:51+5:30
उज्वल निकम, अजय देवगण, प्रियांका चोप्रा यांना पद्मश्री तर अनुपम खेर, सायना नेहवाल आणि सानिया मिर्झाला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज देशातील सर्वोच्च नागरी मानले जाणारे 'पद्म पुरस्कार' जाहीर झाले असून प्रख्यात कायदेतज्ज्ञ उज्जवल निकम , अभिनेता अजय देवगण आणि प्रियांका चोप्रा यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार तर अभिनेते अनुपम खेर, गायक उदित नारायण यांना 'पद्मभूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेले उज्वल निकम हे पहिलेच कायदेतज्ज्ञ आहेत. लोकमत समूहाचे फोटो एडिटर व ज्येष्ठ छायाचित्रकार सुधारक ओलवे यांनाही सामाजिक कार्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
लेन्समागची सुधारक दृष्टी...
लोकमत वृत्तपत्र समूहाचा फोटो एडिटर सुधारक ओलवे याचं नाव पद्मश्री किताब जाहीर झालेल्यांच्या यादीत झळकलं. लोकमत परिवारासाठी ही कमालीची आनंदाची आणि तितकीच अभिमानाची बातमी ठरली. चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या लोकमतमधल्या प्रत्येकाचा उर आनंदानं भरून आलेला. पण हा आनंद ज्याच्यामुळं झाला, तो सुधारक या घडीला जर्मनीत आहे. त्याच्यापर्यंत या भावना पोहोचल्या. इथं त्याच्यासाठी झालेला आनंद अवर्णनीय आहे.
पद्मश्रीसाठी त्याची निवड झाली यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही. हा सन्मान जितका त्याच्या फोटोग्राफीचा आहे, तितकाच किंवा त्याहून काकणभर जास्तच लेन्समागच्या त्याच्या सुधारक दृष्टीचा आहे. नवकोट नारायणांची संपत्ती, डोळे दिपवणारं ऐश्वर्य टिपण्यात सुधारकचं मन कधी रमलं नाही. आज पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या या फोटोग्राफरचा जीव कायम वंचितांच्या प्रतिष्ठेसाठी आणि सामाजिक न्यायासाठी जळत राहिलाय. बरं ही भावना कोरड्या तत्वज्ञानासारखी नाही. सुधारकनं स्वतः आधी केलं मग सांगितलं.
आजच्या घडीला जर्मनीत असलेला हा फोटोग्राफर जग पादाक्रांत करून आलाय. वॉशिंग्टनपासून अॅमस्टरडॅमपर्यंत आणि ढाक्यापासून दिल्लीपर्यंत अनेक ठिकाणी त्याच्या फोटोग्राफसची प्रदर्शनं झाली. पण याचा जीव घुटमळतो, तो भारताच्या कानाकोप-यात आजही सामाजिक न्यायापासून वंचित राहिलेल्यांच्या आयुष्याभोवती. जे जिणं आपण औटघटकेपुरतंही जगू शकत नाही, ते जगत राहणा-या, तुमच्या आमच्या सुखकर आयुष्यासाठी नरकयातना भोगणा-या कष्टक-यांच्या असह्य दिनक्रमाभोवती. टीचभर पोटासाठी रेड लाइट एरियात स्वतःचं आयुष्य अंधारात ढकलणा-या हजारो अनाम मुली-बायकांच्या अगतिकतेभोवती. अकोल्यातून मुंबईत आलेल्या सुधारकचे डोळे संपत्तीच्या प्रदर्शनानं दिपत नाहीत, पण सामाजिक अन्यायाच्या दर्शनानं नक्की पाणावतात.
हे सारं त्याच्या सुधारक दृष्टीनं वेळोवेळी टिपलं. ते दाहक सत्य खूप बोलकं होतं. तरीही तो स्वतः त्याविषयी संधी मिळेल, तेव्हा बोलत राहिला. आजही बोलतो. त्याच्या मनात शोषित पीडितांविषयी असलेली कणव अस्सल आहे. तो स्वतः आजही समाजातला सर्वात तळातला माणूस असल्यासारखा वागतो, बोलतो. मुख्य म्हणजे कृती करतो.
कोणताही अभिनिवेश न ठेवता तो मुंबईतल्या सफाई कामगारांच्या मुलांसाठी दर वीकेण्डला विनामूल्य फोटोग्राफीचं शिबिर चालवतो. तो स्वतःला रस्त्यावरचा मानतो. आणि रस्त्यावरच्या सामान्यातल्या सामान्य माणसासाठी आपली कला वापरतो.
ज्या दिवशी तो कॅमेरा क्लिक करत नाही, त्या दिवशी तो अस्वस्थ होतो. एकही चांगला फोटो टिपला नाही म्हणजे दिवस वाया गेला असं त्याला वाटतं...ती त्याच्यातल्या अस्वस्थ फोटोग्राफरची आणि तितक्याच संवेदनशील माणसाची ओळख आहे.
सुधारकला नीट ओळखणारा कुणीही त्याच्या साध्या राहणीवरनं त्याची परीक्षा करीत नाही. त्याच्या हातातला कॅमेरा सोडला, तर त्याला ब्रॅण्डचं ना फॅड आहे, ना वेड.
आता तर तो स्वतःच ब्रॅण्ड बनलाय...
सुधारक तुला मिळालेल्या या पोचपावतीबद्दल लोकमत परिवाराचा उर आनंदानं भरून आलाय...तुझ्या प्रत्येक चाहत्याच्या मनात हीच भावना असणार. जिथे मराठी तिथे लोकमत ही ओळख बनलेल्या आपल्या समूहाच्या वतीनं तुझं मनःपूर्वक अभिनंदन.
पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी :
रजनीकांत
रामोजी राव
काश्मिरचे माजी राज्यपाल जगमोहन
श्री श्री रवीशंकर
यामिनी कृष्णमूर्ती
गिरीजादेवी
डॉ. विश्वनाथन शांता
वासुदेव अत्रे
अविनाश दीक्षित
धीरूभाई अंबानी (मरणोत्तर पुरस्कार)
पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी :
अनुपम खेर
उदित नारायण
राम सुतार
विनोद राय
हसनम कन्हैयालाल
सानिया मिर्झा
सायना नेहवाल
स्वामी दयानंद (मरणोत्तर)
रॉबर्ट ब्लॅकवेल
डॉ यरलागडा लक्ष्मी प्रसाद
स्वामी तेजोमयानंद
डॉ बरजिंदर हमदर्द
प्रा. नागेश्वर रेड्डी
हफीझ काँट्रॅक्टर
रवींद्र भार्गव
वेंकट रामाराव आला
प्रा. एन. एस. रामानुज ताताचार्य
वेंकटराम राव आला
पालनजी शापूरजी मिस्त्री
पद्मश्री पुरस्काराचे मानकरी :
सुधारक ओलवे
अॅड. उज्वल निकम
प्रा. डॉ. जी.डी. यादव
मधुर भांडारकर
अजय देवगण
प्रियांका चोप्रा
पं. तुळशीदास बोरकर
डॉ. सोमा घोष
श्री लीला माधव पांडा
एस.एस.राजामौली
प्रतिभा प्रल्हाद
भिकूदन गढवी
श्रीभास चंद्र सुपाकर
प्रा.एम. व्यंकटेश कुमार
गुलाबी सपेरा
ममता चंद्राकार
मालिनी अवस्थी
जयप्रकाश लेखीवाल
के. लक्ष्मा गौड
भालचंद्र दत्तात्रय मोंढे
नरेश चंदर लाल
धीरेंद्रनाथ बेजबारूआ
प्रल्हाद चंद्र तासा
डॉ. रवींद्र नागर
डाहय़ाभाई शास्त्री
डॉ. एस. भैरप्पा
हलदर नाग
प्रा. पुष्पेश पंत
जवाहरलाल कौल
अशोक मलिक
डॉ. मन्नम गोपीचंद
प्रा. रवी कांत
प्रा. रामहर्ष सिंग
प्रा. शिव नारायण कुरील
सव्यसाची सरकार
डॉ. आला गोपालकृष्ण गोखले
प्रा. टी. के. लाहिरी
डॉ. प्रवीण चंद्र
प्रा.डॉ. दलजित सिंग गंभीर
डॉ. चंद्रशेखर शेषाद्री थोगुलुवा
डॉ. श्रीमती अनिल कुमारी मल्होत्र
प्रा. एम.व्ही. पद्म श्रीवास्तव
डॉ. सुधीर शहा
डॉ. एम. एम. जोशी
प्रा. डॉ. जॉन एब्नेझार
डॉ. नयुदम्मा यारलागड्डा
इम्तियाज कुरेशी
पीयुष पांडे
सुभाष पालेकर
रवींद्रकुमार सिन्हा
एच. आर. नागेंद्र
एम. सी. मेहता
एम. एम. कृष्णमणी
डॉ.सतीश कुमार
टोखेहो सेमा
डॉ. मयलस्वामी अण्णादुराई
प्रा. दीपंकर चटर्जी
ओंकारनाथ श्रीवास्तव
प्रा. वीणा टंडन
सुनीता कृष्णन
अजोयकुमार दत्त
एम. पंडित दासा
पी. पी. गोपीनाथन नायर
श्रीनिवासन कंडालाई