ब्रिटनची विमानसेवा ८ जानेवारीपासून सुरू होणार; सरकारनं जारी केली एसओपी
By जयदीप दाभोळकर | Published: January 2, 2021 04:15 PM2021-01-02T16:15:29+5:302021-01-02T16:19:17+5:30
UK Flight : नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर सरकारनं भारत ब्रिटन बंद केली होती विमानसेवा
सर्वप्रथम कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर ब्रिटनमध्ये काही दिवस लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. तसंच या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपली विमानसेवाही तात्पुरती स्थगित केली होती. भारतानंदेखील ब्रिटनची विमानसेवा ७ जानेवारीपर्यंत स्थगित केली होती. पण आता ८ जानेवारीपासून ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती नागरी उड्डयण मंत्रालयाकडून देण्यात आली होती. त्यानंतर आता सरकारकडून एसओपी जारी करण्यात आल्या आहेत.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या एसओपीनुसार डीजीसीए केवळ मर्यादित संख्येतच विमानांना परवानगी देणार आहे. याव्यतिरिक्त दोन विमानांच्या येण्याजाण्यात एतकी वेळ ठेवण्यात येईल जेणेकरून विमानतळावर प्रवाशांची कोणतीही गर्दी होणार नाही, याचीही काळजी डीजीसीएद्वारे घेण्यात येईल. तसंच विमान सेवा देणाऱ्या कंपन्या कोणत्याही प्रवाशाला तिसऱ्या देशाच्या ट्रान्झिट एअरपोर्ट द्वारे ब्रिटनहून भारतात प्रवास करण्याला परवानगी देणार नाही याचीदेखील काळजी डीजीसीएद्वारे घेण्यात येणार असल्याचंही एसओपीमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
Health Ministry issues SOP for Epidemiological Surveillance & Response for new variant of COVID19 in context of regulated resumption of limited flights originating from United Kingdom to India from Jan 8; 'passengers testing positive shall be isolated at institutional facilities' pic.twitter.com/f9oHjv4tpQ
— ANI (@ANI) January 2, 2021
नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी अहवाल आवश्यक
ब्रिटनमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्यांच्यासोबत आरटी-पीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल आणणं अनिवार्य असणार आहे. तसंच ही चाचणी प्रवासाच्या ७२ तास आधी केलेली असावी. विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या बोर्डिंगदरम्यान सर्व प्रवाशांकडे चाचणीचे अहवाल आहेत का नाही याची तपासणी करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
आठवड्याला ३० उड्डाणांना परवानगी
यापूर्वी शुक्रवारी मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी भारत ब्रिटनदरम्यान ८ जानेवारीपासून विमान सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती दिली होती. तसंच दोन्ही देशांमध्ये आठवड्याला केवळ ३० उड्डाणांना परवानगी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. २३ जानेवारीपर्यंतच हे सुरू राहणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं.