शेवटी सत्याचाच विजय होईल - केजरीवाल
By admin | Published: May 8, 2017 09:52 PM2017-05-08T21:52:01+5:302017-05-08T22:35:51+5:30
लाचखोरी प्रकरणावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अखेर मौन सोडले आहे. काही झाले तरी अखेर सत्याचाच विजय होईल
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - कपिल मिश्रा यांनी केलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणाबाबत अखेर आपले मौन सोडले आहे. गेले दोन दिवस सुरू असलेली आरोपांची मालिका आणि आज संध्याकाळी कपिल मिश्रा यांचे पक्षातून निलंबन झाल्यानंतर केजरीवाल यांनी या प्रकरणावर प्रथमच भाष्य करताना शेवटी सत्याचाच विजय होईल, उद्या होणाऱ्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनापासून त्याची सुरुवात होईल, असे ट्विट केले आहे.
केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप कपिल मिश्रा यांनी केला होता. या आरोपामुळे आधीच अंतर्गत वादविवादांनी पोखरलेल्या आपमध्ये मतभेद अधिकच तीव्र झाले होते. दरम्यान, आज संघ्याकाळी आपच्या संसदीय समितीने कपिल मिश्रांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांचे पक्षातून निलंबन केले होते. दरम्यान, सत्येंद्र मिश्रा यांनीही मिश्रा यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते.
जीत सत्य की होगी। कल दिल्ली विधान सभा के विशेष सत्र से इसकी शुरुआत।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 8, 2017
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहकारी मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा सनसनाटी आरोप सरकारमधील बरखास्त करण्यात आलेले मंत्री कपिल मिश्रा यांनी रविवारी केला होता. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी हे आरोप फेटाळले असले, तरी या मुद्द्यावरून भाजपा व इतर पक्ष आक्रमक झाले. केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.
मिश्रा यांच्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पत्रकारांशी बोलताना मिश्रा म्हणाले की, ‘जैन यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानी केजरीवाल यांना नगदी दोन कोटी रुपये देताना आपण बघितले. आपण याबाबत केजरीवाल यांना विचारणा केली असता, ते म्हणाले होते की, ‘राजकारणात अशा गोष्टी होत असतात.’ जैन यांनी आपल्याला असे सांगितले होते की, त्यांनी केजरीवाल यांच्या नातेवाईकांचा ५० कोटींचा जमिनीचा एक व्यवहार केला आहे. याबाबतही आपण केजरीवाल यांना विचारणा केली असता, हे सर्व खोटे असल्याचे सांगत, आपल्यावर विश्वास ठेवा, असे ते म्हणाले.’