Uma Bharti : "स्टार प्रचारक घोषित करण्याची गरज नाही, मी स्वतः सुपरस्टार..."; उमा भारतींनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 05:10 PM2024-03-07T17:10:57+5:302024-03-07T17:25:50+5:30
Uma Bharti : भाजपाने नुकतीच 195 जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर केली. या पहिल्या यादीत फायर ब्रँड नेत्या उमा भारती यांचे नाव न आल्याने विविध प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या. आता उमा भारती यांनी स्वतः पुढे येऊन यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भाजपाने नुकतीच 195 जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर केली. या पहिल्या यादीत फायर ब्रँड नेत्या उमा भारती यांचे नाव न आल्याने विविध प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या. आता उमा भारती यांनी स्वतः पुढे येऊन यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं की, "मी स्वतः निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. याचे कारणही त्यांनी एका मोठ्या पदाधिकाऱ्याला सांगितलं आहे. पक्षाला जिथे माझी गरज असेल तिथे मी प्रचार करेन. मला स्टार प्रचारक घोषित करण्याची गरज नाही. मी स्वतःला सुपरस्टार समजते."
"गेल्या तीन-चार दिवसांपासून मी कुठून निवडणूक लढवत आहे, मी का लढत नाही, या चर्चेला सामोरे जावे लागत आहे. 22 जानेवारीला मी एका महत्त्वाच्या व्यक्तीला सांगितलं होतं की, मी दोन वर्षे निवडणूक लढवणार नाही. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात मी पुढच्या रांगेत बसले होते तेव्हा अयोध्या आंदोलनाच्या आठवणी जाग्या झाल्या. आज कोणामुळे हा क्षण आपल्याला बघायला मिळतोय असा प्रश्न मला पडला. तर ते होते अशोक सिंघलजी."
"माझ्या निश्चयामध्ये काहीतरी उणीव असल्याचं जाणवलं आणि गंगेचं काम तिथेच थांबलं. त्यामुळे त्या 5-6 तासातं माझं मन खूप अस्वस्थ झालं. त्यावेळी मी त्या मोठ्या पदाधिकाऱ्यांसोबत बसली होती. मी त्यांना सांगितलं की, मी निवडणूक लढवली तर लोकसभा मतदारसंघ आणि गंगा काम एकाच वेळी शक्य होणार नाही. म्हणूनच मला दोन वर्षांसाठी पूर्ण स्वातंत्र्य हवे आहे. या दरम्यान मी स्वतःला या कामात झोकून देईन."
"ते म्हणाले की, गंगेबाबत कोणताही वाद नाही. यावर सर्वांची एकजूट आहे. योजनाही तयार करण्यात आली आहे. मंजुरीही देण्यात आली आहे. फक्त वेग कमी झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही गंगा नदीच्या कामावर विश्वास आणि आस्था आहे. ही गोष्ट बी.एल.संतोषजींना सांगा. जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. 24 फेब्रुवारी रोजी मी मंत्र्यांची भेट घेतली. मी संतोषजींना सांगितलं की, जर तुम्हाला माझी गरज असेल तर मी प्रचार करेन" असंही उमा भारती यांनी म्हटलं आहे.