सलग ३९ व्या दिवशी बरे होणाऱ्यांचे प्रमाण नव्या रुग्णांपेक्षा अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 01:07 AM2021-01-06T01:07:47+5:302021-01-06T07:45:43+5:30
Corona Virus News: देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ३ लाख ५६ हजार ८४४ इतकी झाली आहे, तर एकूण १ लाख ४९ हजार ८५० लोकांचा या रोगाने बळी घेतला आहे.
नवी दिल्ली : भारतात सोमवारी एका दिवसात १६ हजार ३७५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असली तरी गेल्या २४ तासांत २९ हजार ९१ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सलग ३९ व्या दिवशी बरे होणाऱ्यांची संख्या आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांपेक्षा अधिक असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सध्या असलेल्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या घटून २ लाख ३१ हजार ३६ वर पोहोचली आहे. भारतात सोमवारी लंडनच्या नवसंकरित कोरोना विषाणूचे २० नवे रुग्ण आढळल्याने या स्ट्रेनच्या एकूण बाधितांची संख्या ५८ झाली आहे.
देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ३ लाख ५६ हजार ८४४ इतकी झाली आहे, तर एकूण १ लाख ४९ हजार ८५० लोकांचा या रोगाने बळी घेतला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या २.२३ टक्के आहे. आतापर्यंत ९९ लाख ७५ हजार ९५८ रुग्ण कोरोनातून पूर्णपण बरे झाले आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९६.३२ टक्के असून, मृत्यूदर केवळ १.४५ टक्के आहे. महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक १० हजार ३६२ रुग्ण बरे झाले, तर हीच संख्या केरळमध्ये ५ हजार १४५ आणि छत्तीसगडमध्ये १ हजार ३४९ इतकी आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासांत ४ हजार ८७५ नवे रुग्ण आढळले.
स्पुटनिक, झेडव्हाय कोव्ह-डींना मंजुरीची प्रतीक्षा
भारत बायोटेक व पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या लसींना भारताने मान्यता दिल्यानंतर आता फायझर व रशियन स्पुटनिक-५ लस विकसित करणाऱ्या संशोधकांमध्ये उत्साह आहे. डीजीसीआयने या दोन्ही लसींच्या चाचण्यांची माहिती मागवली आहे. विशेष म्हणजे स्पुटनिक लसीला जगात सर्वांत पहिल्यांदा मान्यता मिळाली. रशियाने दोन महिन्यांपूर्वी या लसीला मान्यता दिली होती.
स्पुटनिक-५ ही लस रशियात विकसित झाली असून, भारतात लसीच्या चाचण्या डाॅ. रेड्डी लॅबने केल्या आहेत. या लसीच्या मान्यतेसाठीदेखील अर्ज करण्यात आला आहे. लसीच्या परिणामकारकतेवर विविध दावे-प्रतिदावे, लसीच्या दुष्परिणामांवरही चर्चा सुरू असली तरी अमेरिका, रशिया, कॅनडासह भारतही लसीकरणास परवानगी देणाऱ्या निवडक देशांच्या यादीत आहे.
ऑक्स्फर्ड विद्यापीठाने विकसित केलेली कोविशिल्ड, तर भारत बायोटेक व आयसीएमआरने विकसित केलेली कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींसह जगात चार इतर लसी विकसित होत आहेत. त्यापैकी अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट आफ ॲलर्जी ॲण्ड इन्फेक्शिअस डिसिजेस बायोमेडिकल ॲडव्हान्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ॲथाॅरिटी व माॅडर्ना कंपनीच्या लसीला भारतात अद्याप परवानगी मिळालेली नाही.