उपचार परवडेना, रोजचा खर्च ६,७८८ रुपये! सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी इस्पितळांचा खर्च दुपटीपेक्षा जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 08:24 AM2022-11-10T08:24:33+5:302022-11-10T08:24:46+5:30
खासगी रुग्णालयांत भरती होऊन उपचार घेण्याचा खर्च सरकारी रुग्णालयांपेक्षा सुमारे अडीच पट अधिक असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
नवी दिल्ली :
खासगी रुग्णालयांत भरती होऊन उपचार घेण्याचा खर्च सरकारी रुग्णालयांपेक्षा सुमारे अडीच पट अधिक असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
जोधपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (आयआयटी) हे सर्वेक्षण केले आहे. अहवालात म्हटले आहे की, खासगी रुग्णालयात उपचार घेण्याचा प्रतिदिन सरासरी खर्च ६,७८८ रुपये आहे. तोच सरकारी रुग्णालयात २,८३३ रुपये इतका आहे. याचाच अर्थ सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयातील उपचार खर्च प्रतिदिन ३,९९५ रुपयांनी अधिक आहे.
परिवार सर्वेक्षण आणि सरकारी खर्चावरील आरोग्य विमा यांचा आधार त्यासाठी घेण्यात आला. उपचाराच्या बाबतीत पुरवठ्यावरील सरकारी खर्च हा एकूण खर्चाच्या १६ टक्के असून मागणीच्या बाजूने पीएफएचआयचा खर्च १६ टक्के, रोख प्रोत्साहन लाभ १ टक्का आणि रुग्णांच्या खिशातून होणार खर्च ६७ टक्के आहे. रुग्णांच्या खिशांतून खर्च होण्याचे सरकारी रुग्णालयांतील प्रमाण ३१ टक्के, तर खासगी रुग्णालयांत ८६ टक्के आहे.
काय करावे लागेल?
- सहायक प्राध्यापक अलोक राजन यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांतील खर्च अधिक असल्यामुळे सार्वजनिक आरोग्य सुविधांत अधिकाधिक गुंतवणूक करण्याची गरज आहे.
- भारतीय आरोग्य क्षेत्रातील खर्चाचा अभ्यास करणारे हे पहिलेच सर्वेक्षण आहे. यात खासगी व सरकारी अशा दोन्ही रुग्णालयांत रुग्णांवर पडणाऱ्या भाराची तुलना केली आहे.