निवडणुकांत मतपत्रिकांचा वापर अशक्य- मुख्य निवडणूक आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 01:48 AM2019-08-10T01:48:57+5:302019-08-10T06:23:32+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा केला उल्लेख
कोलकाता : निवडणुकांमध्ये पुन्हा मतपत्रिकांचा वापर केला जाणार नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी ठामपणे सांगितले. ईव्हीएमऐवजी निवडणुकांत मतपत्रिकांचा वापर सुरू करावा ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सातत्याने लावून धरलेली मागणी निवडणूक आयुक्तांनी अशा प्रकारे फेटाळून लावली.
सुनील अरोरा म्हणाले की, निवडणुकांत मतदानाच्या जुन्या पद्धतीकडे पुन्हा वळणे शक्यच नाही. मतपत्रिकांचा पुन्हा वापर करण्याच्या मागणीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने वारंवार विरोधात निकाल दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे का, या प्रश्नावर सुनील अरोरा म्हणाले की, यासंदर्भात केंद्रीय गृह तसेच विधि खात्याकडून निवडणूक आयोगाला अधिकृतपणे कळवण्यात आल्यानंतरच पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकेल.
आयोग भाजपपुढे झुकल्याची टीका
लोकसभा निवडणुकांत ईव्हीएममध्ये फेरफार करून भाजपने विजय मिळविला आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेस, तेलगू देसम पक्ष आदींसह अन्य विरोधी पक्षांनी केला होता. ईव्हीएमच्या विरोधात व व्हीव्हीपॅटच्या मुद्यावरून २१ पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
निवडणुकांत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही केली असून, त्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी मध्यंतरी ममता बॅनर्जी यांची कोलकातामध्ये भेट घेऊन या मुद्यावर चर्चाही केली होती. निवडणूक आयोग भाजप व नरेंद्र मोदींपुढे झुकल्याचा आरोप विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात व नंतरही केला होता.