आधार नसल्यास मुलांना शाळेत प्रवेश नाकारणे बेकायदा; यूआईडीएआईची तंबी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 04:45 PM2018-09-05T16:45:07+5:302018-09-05T16:46:04+5:30
यूआईडीएआईने याविरोधात पाऊल उचलले असून आधार नसल्यासही मुलांना शाळांमध्ये प्रवेश देण्याची ताकीद दिली आहे.
नवी दिल्ली : बहुतांश शाळांनी विद्यार्थ्य़ांना आधार कार्डची सक्ती केली आहे. यामुळे शाळेत प्रवेश घ्यायचा असेल मुलाकडे तर आधार नसल्याचे सांगून प्रवेश नाकारला जात होता. यामुळे बऱ्याच मुलांना शिक्षणापासून लांब रहावे लागत होते. आता यूआईडीएआईने याविरोधात पाऊल उचलले असून आधार नसल्यासही मुलांना शाळांमध्ये प्रवेश देण्याची ताकीद दिली आहे.
मुलांना आधार नसल्यामुळे प्रवेश नाकारणे बेकायदेशीर असल्याचे यूआईडीएआईने म्हटले आहे. याबाबतचे पत्र सर्व राज्यांच्या सचिवांना पाठविण्यात आले आहे. तसेच शाळांना आपल्या परिसरामध्ये आधार कार्ड बनविण्यासाठी विशेष शिबिरेही घेण्यास सांगितले आहे.
यासाठी स्थानिक बँकांच्या शाखा, पोस्ट ऑफिसस राज्यांच्या शिक्षण संस्था आणि जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करण्यासही सांगितले आहे.
एखाद्या मुलाचे आधार कार्ड बनलेले नसल्यास त्याच्या अन्य ओळख पटविण्य़ासाठीच्या कागदपत्रांचा वापर करावा. कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या मुलभूत अधिकारांपासून दूर ठेवू नये. अशा प्रकारची शाळांची मनमानी बेकायदेशीर आहे.