अनधिकृत दर्ग्याला नोटीस दिल्याने गुजरातमध्ये भडकली हिंसा; डीएसपींसह तीन पोलीस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 08:26 AM2023-06-17T08:26:34+5:302023-06-17T08:37:26+5:30
नोटीस आल्याचे समजताच सायंकाळी सात वाजताच लोक जमण्यास सुरुवात झाली होती. नऊ वाजता २०० ते ३०० लोक जमा झाले.
गुजरातच्या जुनागढमध्ये शुक्रवारी रात्री एका अनधिकृत दर्ग्यावरून दंगलीचे स्वरुप प्राप्त झाले होते. दर्ग्याच्या अवैध बांधकामावरून प्रशासनाने नोटीस जारी केली होती. यामुळे लोक भडकले होते, त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. मजेवडी चौकातील पोलीस ठाण्यावर जमावाने हल्ला केला आणि तोडफोड केली. तसेच पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या. पोलीस ठाण्यावर दगडफेकही करण्यात आली.
नोटीस आल्याचे समजताच सायंकाळी सात वाजताच लोक जमण्यास सुरुवात झाली होती. नऊ वाजता २०० ते ३०० लोक जमा झाले. पोलिसांनी या लोकांना तिथून हटविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी पोलिसांवरच दगडफेक केली. यानंतर थेट हल्ला चढविला. यामध्ये एक डीएसपी आणि तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यानंतर पोलिसांनी अॅक्शन घेत दंगा नियंत्रणात आणला.
मजेवडीमध्ये रस्त्याच्या मधोमध दर्गा उभारण्यात आला आहे. तो हटविण्यासाठी महापालिकेकडून नोटीस जारी करण्यात आली होती. हे धार्मिक स्थळ अवैधरित्या बांधण्यात आले आहे. पाच दिवसांत कायदेशीर पुरावे जमा करावेत नाहीतर हा दर्गा पाडण्यात येईल. त्याचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल असे या नोटीसीमध्ये म्हटले होते. नोटीस मिळताच समाजकंटक जमा झाले आणि घोषणाबाजी करू लागले होते. यानंतर हा प्रकार घडला आहे.