उपोषणाबद्दल अनिश्चितता कायम, केंद्राच्या कार्यपद्धतीबद्दल अण्णासमर्थकांची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 03:24 AM2018-03-28T03:24:35+5:302018-03-28T03:24:35+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण कधी सुटणार, याबाबत अनिश्चितता कायम
विश्वास खोड
नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण कधी सुटणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे. अण्णांशी बातचीत करण्यासाठी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन दिल्लीत आहेत. मंगळवारी सकाळी महाजन यांच्या स्वीय सहायकांनी अण्णांना भेटून केंद्र सरकारच्या आश्वासनांचा मसुदा वाचून दाखविला. अण्णांनी त्यात सुधारणा सुचविल्या असून, या सूचना तातडीने पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत.
महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत. उद्या सकाळपर्यंत सरकारी अधिकारीही येतील, असे अण्णा हजारे यांनी आज सांगितले. अण्णांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता. गिरीश महाजन यांच्याशी सुरू असलेल्या चर्चेमुळे काहीतरी ठोस तोडगा निघेल, अशी आशा आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना होती. मात्र, केंद्र सरकारने महाराष्ट्रातील एका मंत्र्यांच्या स्वीय सहायकाला अण्णांशी चर्चा करण्यासाठी पाठविले. त्यामुळे केंद्र सरकारच्या असंवेदनशील कार्यपद्धतीबद्दल आंदोलकाच्या संयोजकांनी नाराजी व्यक्त केली.
अण्णांचे वजन पाच किलोने घटले आहे. तरीही अण्णांनी सकाळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि चिंतेचे काही कारण नाही, अशा शब्दांत आंदोलकांचा हुरूप वाढविला. आपल्याला पाठिंबा देण्यासाठी बारा राज्यांमध्ये आंदोलन सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. आपले आंदोलन सरकारविरोधात नाही, तर सरकारने त्यांचे कर्तव्य करावे, यासाठी आहे, असे अण्णांनी नमूद केले.
अण्णांची विश्वंभर चौधरी यांची भेट घेतली. त्यानंतर, शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे केंद्र सरकारने अवमूल्यन केले, असा आरोप चौधरी यांनी केला. अण्णांशी चर्चा करण्यासाठी किमान केंद्रीय मंत्री सरकारने पाठविणे आवश्यक आहे, असेही चौधरी म्हणाले. काँग्रेस सरकारने २०११ मधील आंदोलन अत्यंत संवेदनशीलतेने हाताळल्याचेही त्यांनी नमूद केले.
१४ जणांची प्रकृती बिघडली
बलराम आणि महेंद्र प्रताप या आंदोलकांना प्रकृती बिघडताच, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. रविवारीही तिघांची प्रकृती बिघडली होती. आंदोलन काळात १४ जणांची प्रकृती बिघडली, पण हे सर्वजण रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर ते पुन्हा आंदोलनात सहभागी झालेत. उन्हामध्ये प्रकृतीची काळजी घेण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचे आवाहन अण्णांनी आंदोलकांना केले.