हिंदू युवा वाहिनीच्या वाढत्या प्रभावाने RSS मध्ये अस्वस्थतता
By admin | Published: May 16, 2017 08:14 AM2017-05-16T08:14:44+5:302017-05-16T08:14:44+5:30
हिंदू युवा वाहिनीच्या या आक्रमकतेमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होईल अशी भिती आरएसएस आणि भाजपा नेत्यांना वाटत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 16 - उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ विराजमान झाल्यापासून हिंदू युवा वाहिनीचा प्रभाव आणि प्रसार वाढत चालल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या गोटात अस्वस्थतता निर्माण झाल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. आरएसएसच्या वरिष्ठ नेत्यांनी हिंदू युवा वाहिनीबद्दल वाटणारी चिंता योगी आदित्यनाथ यांच्या कानावर घातली आहे. योगी आदित्यनाथ यांनीच हिंदू युवा वाहिनीची स्थापना केली आहे.
हिंदू युवा वाहिनीची आरएसएस आणि भाजपाप्रमाणेच समांतर विचारधारा आहे. मागच्या दोन महिन्यात उत्तरप्रदेशात वेगवेगळया ठिकाणी घडलेल्या जातीय हिंसाराच्या घटनांमध्ये हिंदू युवा वाहिनीविरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. वाहिनीचे कार्यकर्ते गळयात भगवे स्कार्फ घालून हिंदुत्व आणि गोरक्षणाच्या नावाखाली लोकांना त्रास देतात असे आरोप विरोधी पक्षांनी केले आहेत.
हिंदू युवा वाहिनीच्या या आक्रमकतेमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होईल अशी भिती आरएसएस आणि भाजपा नेत्यांना वाटत आहे. भाजपाला तब्बल 15 वर्षानंतर उत्तरप्रदेशात सत्ता मिळाली असून, लोकसभेच्या निवडणुकांना फक्त दोन वर्ष उरली आहेत. हिंदू युवा वाहिनीमुळे लोकसभेत फटका बसू नये यासाठी आरएसएस आणि भाजपाने आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
योगी आदित्यनाथ यांनी सन 2002 मध्ये हिंदू युवा वाहिनीची स्थापना केली. कट्टर हिंदुत्ववादी संघटना अशी वाहिनीची ओळख असून हिंदू संस्कृती, गोरक्षण या मुद्यावरुन संघटनेने यापूर्वी आंदोलने केली आहेत. योगींचा बालेकिल्ला असलेला गोरखपूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये या संघटनेचा प्रभाव आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून उत्तरप्रदेशच्या अन्य जिल्ह्यामध्येही मोठया संख्येने युवक युवा वाहिनीचे सदस्य होत असून, या संघटनेचा प्रभाव वाढत चालला आहे.