बिहारमध्येही रंगतेय काका-पुतण्याचे राजकारण, चिराग अन् पशुपती पारस येणार आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 10:16 AM2024-03-24T10:16:05+5:302024-03-24T10:16:39+5:30
भाजपच्या नेतृत्वाने आधी नितीश कुमार व आता चिराग पासवान यांना एनडीएमध्ये सहभागी केले.
- राजेश शेगाेकार
पाटणा : बिहारच्या राजकीय कुरूक्षेत्रावरही काका-पुतण्यामधील वर्चस्वाचे, कुरघाेडीचे राजकारण रंगत आहे. पशुपती पारस अन् चिराग पासवान या काका-पुतण्याच्या जाेडीला ज्यांचा राजकीय विचारांचा वारसा मिळाला, त्या दिवंगत रामविलास पासवान यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हाजीपूर मतदारसंघात हे काका-पुतणे समाेरासमाेर उभे ठाकणार आहेत.
भाजपच्या नेतृत्वाने आधी नितीश कुमार व आता चिराग पासवान यांना एनडीएमध्ये सहभागी केले. चिराग यांच्या लोकजनशक्ती पार्टीला प्राधान्य देत एनडीएच्या जागा वाटपात यापूर्वी घटक पक्ष राष्ट्रीय लोक जनशक्तीचे प्रमुख, केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांच्या वाट्याला एकही जागा दिली नाही. पारस यांच्या सहा खासदारांचा केंद्रात भाजपला पाठिंबा हाेता हे विशेष! आता पारस हे महागठबंधनच्या संपर्कात आहेत. त्यांना हाजीपूर येथून उमेदवारीची शक्यता आहे. असे झाल्यास हाजीपूरमध्ये पासवान कुटुंबाची लढाई चुरशीची हाेईल, शिवाय रामविलास यांचा पुढील वारसा काेणाच्या हातात राहील, याचाही निर्णय हाेईल.
चिराग पासवान यांच्या हाती कार्ड
चिराग यांच्या पक्षाला वैशाली, हाजीपूर, समस्तीपूर, खगरिया आणि जमुई या पाच दिल्या आहेत. हाजीपूर मतदारसंघात स्वत: चिराग लढणार आहेत. समस्तीपूरचे खा. राजकुमार राज, वैशालीच्या खा. वीणा देवी व खगरियाचे खासदार मेहबूब अली कैसर हे पारस यांच्या पक्षात हाेते. मात्र, कैसर हे एनडीएचे उमेदवार हाेऊ शकतात.
लालुंचे घोषणा कुशवाहा कार्ड
महागठबंधनचे जागा वाटप जाहीर होण्यापूर्वीच राजदचे सुप्रीमो लालू प्रसाद यांनी चारही जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. त्यामुळे आघाडीत कुरबुरी सुरू झाल्या. लालू यांनी औरंगाबादमधून अभय कुशवाहा, नवादातून श्रवण कुशवाहा यांना उमेदवारी देऊन भाजपच्या कुशवाहा कार्डला धक्का दिला. गयामध्ये माजी मंत्री कुमार सर्वजित, जमुईमध्ये अर्चना रविदास यांना उमेदवारी घोषित केली आहे.