अस्वस्थ एकटेपणा आणि चिडचिड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:16 AM2020-05-27T00:16:01+5:302020-05-27T00:16:15+5:30
कंपन्यांसाठी हा फायद्याचा सौदा असला, तरीही ‘ओव्हरहेड’ वाचवण्याच्या ‘जमे’च्या शेजारी ‘खर्चा’चे नवे रकानेही तयार झाले आहेतच
आॅफिसला जाणं ही समाजाच्या मनोवृत्तीत रुळलेली गोष्ट! प्रवासाचा त्रास, ताण असला, तरी ‘आॅफिस’ ही अनेकांसाठी रोजच्या प्रापंचिक रामरगाड्यातली हवीहवीशी ‘सुटकेची झुळूक’ असतेच. रोजचे आठ-दहा तास घराबाहेर स्वत:चं स्वतंत्र विश्व तयार करण्याची संधीच ती! घर वेगळं व आॅफिस वेगळं अशा दुहेरी कसरतीत जगण्याचा रस्ता शोधलेल्या अनेकांना ‘वर्क फ्रॉम होम’ने रडकुंडीला आणलंय. सर्वांच्या ‘होम’मध्ये ‘वर्क’साठी जागा, स्वास्थ्य नसतं हेही आहेच! कंपन्यांसाठी हा फायद्याचा सौदा असला, तरीही ‘ओव्हरहेड’ वाचवण्याच्या ‘जमे’च्या शेजारी ‘खर्चा’चे नवे रकानेही तयार झाले आहेतच!
कर्मचाऱ्यांना काय टोचतंय?
फोर्ब्ज मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांपैकी काही स्वत:ला ‘ट्रॅप्ड’ म्हणजेच परिस्थितीत, घरात बंदिस्त समजत असून, त्यांना पुढे काहीच मार्ग दिसेनासे झाले आहेत. च्सततच्या आॅनलाईन मीटिंग, त्यासाठीच्या तांत्रिक जुळवाजुळवीचा त्रास, न संपणारं काम आणि त्यात वरून घरात बंदिस्त राहण्याचा त्रागा, यामुळे शंभरातली सत्तर तरी माणसं रडकुंडीला आलेली आहेत, असं ‘हाइव्हलो’ या प्रख्यात कंपनीने केलेला अभ्यास सांगतो.घरून काम करण्याने मानसिक स्वास्थ्यावर मोठा परिणाम होत असल्याची कबुली देणाºयांची मोठी आकडेवारी असे बहुतांश अभ्यास व पाहण्यांमध्ये दिसू लागली आहे.
घरून काम करताना अनेकांना वजनवाढ, अंगदुखी, डोकेदुखीचा त्रास सुरूझाला आहे. झोप न येणं, अस्वस्थ वाटणं, कामाचे विचार डोक्यातून न जाणं असाही त्रास होतो आहे. अंग गळून जाणं, डोकं जड होणं, निराशा-एकेकटं वाटणं, रडू येणं, उदास वाटणं, चिडचिड होणं या तक्रारी मोठ्या प्रमाणावर दिसतात. ऑफिसपेक्षा जास्त वेळ काम करूनही काम न संपणं ही तक्रार तर जगभर सर्वत्र आहे, त्यामुळे वर्क-लाईफ चक्राचा बोºया वाजलाय. स्त:साठी, कुटुंबासाठी वेळ नसणं, त्यातून कुटुंबकलह वाढल्याचा अनुभवही बहुतेकजण बोलून दाखवितात.
कंपन्यांचे काय प्रश्न आहेत?
अनेक कंपन्या कर्मचारी कपात आणि वेतन कपात करीत आहेत. घरून काम करण्याची परवानगी दिलेल्या कर्मचाºयांच्या कामाच्या मोजमापाच्या पद्धती अनेक कंपन्यांना नव्याने तयार कराव्या लागणार आहेत.
हाइव्हलो कंपनीने केलेल्या अभ्यासानुसार, ५४ टक्के कंपन्या म्हणतात की, डिजिटल कम्युनिकेशनची अजूनही फार खात्री वाटत नाही. इंटरनेट जोडणी बंद पडणं किंवा तिला अपेक्षित वेग नसणं यांसारख्या अडचणी कामावर मोठा परिणाम करू शकतात. कामासाठी वापरली जाणारी सॉफ्टवेअर्स व इतर व्यवस्था ‘रिमोटली’ हाताळू देण्यातून कंपनीची संवेदनशील माहिती बाहेर फुटण्यापासून हॅकिंगच्या शक्यतेमुळे डेटा-सिक्युरिटीच्या काळजीपर्यंत नवे प्रश्न कंपन्यांसमोर उभे राहिले आहेत.
कामगार कायदे आणि वर्क फ्रॉम होम
आधीच बदलत्या वातावरणाने कामगार-कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाºयावर सोडली आहे. ‘वर्क फ्रॉम होम’सारख्या नव्या व्यवस्थेत कर्मचाºयांच्या हितरक्षणाची व्यवस्था अधिकच दुबळी होत जाणार. कामाचे किमान आणि कमाल तास निश्चित असावेत, यासाठी आजवर केलेल्या आंदोलनांचे सगळे संदर्भच आता बदलत चालले असून, माणूस या नव्या व्यवस्थेचा गुलाम होत जाईल, अशी भीती कामगार क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करू लागले आहेत.