विनाअनुदानित सिलिंडर 18 रुपयांनी महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2016 08:33 PM2016-05-01T20:33:44+5:302016-05-01T20:33:44+5:30
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानंतर आता विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरही महागले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1- पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानंतर आता विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरही महागले आहेत. केंद्र सरकारनं विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत 18 रुपयांनी वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या दरवाढीमुळे ही किंमत वाढवल्याची बाब सरकारकडून पुढे केली जाते आहे.
शनिवारी रात्री केंद्र सरकारनं पेट्रोलच्या प्रतिलिटरच्या दरात 1.06 रुपये, तर डिझेलच्या दरात 2.94 रुपयांनी वाढ केली होती. तेल पुरवठा कंपन्यांनी विनाअनुदानित रॉकेलच्या किमतीत 3 रुपयांनी वाढ केली आहे. वर्षाकाठी 12 सिलिंडरवर ग्राहकांना अनुदान मिळते. मात्र विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत 18 रुपयांनी वाढ केल्यानं ग्राहकांना याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. आता विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 509.50 वरून 527.50 रुपये होणार आहे. 1 एप्रिलला 4 रुपयांनी तर 1 मार्चला 61.50 रुपयांनी, 1 फेब्रुवारीला 82.5 रुपयांनी विनाअनुदानित सिलिंडरच्या किमती कमी केल्या होत्या.
यावेळी विमान इंधनाच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. तेल पुरवठादार कंपन्यांनी हवाई इंधनाच्या किमतीतही वाढ केली आहे. हवाई इंधनाच्या किमतीत 1.5 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. आता विमान इंधनाच्या प्रत्येक किलो लिटरमागे 627 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. राज्यातल्या स्थानिक कर आणि व्हॅटमुळे या किमतीत चढउतार राहील. देशात इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियमकडून दर महिन्याला विनाअनुदानित गॅस, रॉकेलच्या किमतींचा आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे नवे दर निश्चित करतात.