‘महाराष्ट्रात संपूर्णपणे घटनाबाह्य सरकार’; ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 07:10 AM2022-12-07T07:10:08+5:302022-12-07T07:10:32+5:30
सर्वोच्च न्यायालयात १३ जानेवारीला पुढील सुनावणी
नवी दिल्ली : महाराष्ट्रात संपूर्णपणे घटनाबाह्य सरकार कार्यरत आहे, असे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
पुढील आठवड्यात पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाला बसणे शक्य होणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पेचाशी संबंधित याचिकांवर १३ जानेवारीला सुनावणी होईल, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने सांगितले. पुढील आठवड्यात विविध प्रकरणे पटलावर आहेत. त्यामुळे या मुद्यावर सुनावणी करणे शक्य होणार नाही. आम्ही १३ जानेवारीला यावर विचार करू, असे खंडपीठाने म्हटले.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर आपण २९ नोव्हेंबरला सुनावणी करणार आहोत. तेव्हा आपल्याकडून काही निर्देश जारी केले जाण्याची शक्यता आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने १ नोव्हेंबर रोजी सांगितले होते. २३ ऑगस्ट रोजी तत्कालीन सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने कायद्याचे अनेक प्रश्न तयार करून याचिका पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवल्या होत्या.