निर्भयाच्या अल्पवयीन बलात्काऱ्याची अज्ञातस्थळी रवानगी
By admin | Published: December 20, 2015 01:53 AM2015-12-20T01:53:55+5:302015-12-20T01:53:55+5:30
संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याप्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या अल्पवयीन आरोपीस रविवारी होणाऱ्या सुटकेच्या
नवी दिल्ली/बदायू : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याप्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या अल्पवयीन आरोपीस रविवारी होणाऱ्या सुटकेच्या पूर्वसंध्येला बाल सुधारगृहातून एका अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले.
दरम्यान, या अल्पवयीन आरोपीची शिक्षा वाढविण्याची मागणी होत असतानाच बदायूमधील त्याच्या गावातील काही लोकांनी त्याच्या प्रवेशास विरोध करण्याची तयारी केली आहे. उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन आरोपीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती वर्तविण्यात आली असून, अनेक संस्था करडी नजर ठेवून आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्याच्या सुटकेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. अज्ञातस्थळावरूनच रविवारी त्याची सुटका करण्यात येईल. या अल्पवयीन आरोपीच्या पुनर्वसनाची योजना तयार करण्यात आली असल्याचे दिल्ली सरकारने सांगितले आहे. या योजनेंतर्गत अल्पवयीन आरोपीस १० हजार रुपयांची आर्थिक मदत आणि शिवणयंत्र देण्यात येईल. जेणेकरून त्याला कपडे शिवण्याचे काम सुरू करता येऊ शकेल. १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत पॅरामेडिकलची २३ वर्षीय विद्यार्थिनी निर्भयावरील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील एका आरोपीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याने, त्याची गणना कायद्यातील व्याख्येनुसार बालगुन्हेगारात झाली होती. त्यानुसार बालगुन्हेगार न्याय मंडळाने त्याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावली होती आणि उत्तर दिल्लीच्या एका सुधारगृहात ठेवण्यात आले होते. बलात्काराच्या घा घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली होती.
गावात प्रवेशास बंदीची तयारी
दरम्यान, तीन वर्षांची शिक्षा भोगून सुटणाऱ्या या अल्पवयीन आरोपीस त्याच्या बदायू येथील गावातील काही लोकांनी प्रवेशबंदी घालण्याचा विचार केला आहे. निर्भयाचा दोषी गावात परतावा, अशी लोकांची इच्छा नाही. गावातील एक वयोवृद्ध नागरिक फुलचंद यांनी सांगितले की, निर्भयाकांडातील या आरोपीचे कृत्य अत्यंत घृणास्पद असून, त्याला आता गावात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे गावाची देश-विदेशात प्रचंड बदनामी झाली. या घटनेनंतर शहरात शिकण्यासाठी गेलेल्या गावातील इतर तरुणांकडेही संशयाने बघितले जात आहे. एवढेच काय पण त्यांना कुणी नोकरी द्यायलाही तयार नाही. परिणामी गावात बेरोजगारांची संख्या वाढली आहे.
फुलचंद यांच्याप्रमाणेच अनिल, कुन्नू, रामपाल, गुलाब आणि नरेशसह इतरही अनेक नागरिकांना निर्भयाचा गुन्हेगार आता गावात नको आहे. परंतु काहींनी त्याला गावात आणून नव्याने चांगले जीवन जगण्याची संधी मिळाली पाहिजे, असे मत मांडले आहे.
या अल्पवयीन आरोपीस परत आणण्यासाठी त्याच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य दिल्लीला जाणार नाही. परंतु बाल सुधारगृहातून सुटकेनंतर त्याने थेट गावात यावे आणि अत्यंत हलाखीचे जीवन जगत असलेल्या आपल्या कुटुंबाला मदत करावी, अशी त्यांची इच्छा असल्याचे त्याच्या आईने सांगितले. (वृत्तसंस्था)