भाजपाच्या उद्धटपणाचा निर्विवाद पराभव!

By Admin | Published: March 12, 2017 12:46 AM2017-03-12T00:46:12+5:302017-03-12T00:46:12+5:30

गोव्यात मतदारांनी उद्धट भाजपाचा पराभव केला आहे. भाजपाचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सात सहकाऱ्यांना मतदारांनी घरचा

Undeniably defeat of BJP's fidget! | भाजपाच्या उद्धटपणाचा निर्विवाद पराभव!

भाजपाच्या उद्धटपणाचा निर्विवाद पराभव!

googlenewsNext

- राजू नायक

गोव्यात मतदारांनी उद्धट भाजपाचा पराभव केला आहे. भाजपाचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सात सहकाऱ्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. २१वरून या पक्षाला १३वर आणले. त्याला कारणे त्या पक्षाच्या नेत्यांच्या अनेक चुका, वचनांना फासलेला हरताळ, प्रशासनाचा खेळखंडोबा आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत काँग्रेसवरही मात करण्याचा प्रयत्न ही आहेत. आणि काँग्रेसने १७ जागा प्राप्त केलेल्या आहेत. ते जरी पूर्ण बहुमत मिळवू शकले नसले तरी त्यांना सर्वांत मोठा पक्ष म्हणून लोकांनी निवडून आणलेले आहे. त्यामुळे भाजपाने आता मतदारांच्या कौलाचा मान राखून विरोधी बाकांवर बसणे शहाणपणाचे ठरेल. त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अजूनही भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचे मांडे खात आहेत. ज्याचा पुन्हा मतदारांच्या भावनांना तुच्छ लेखून उद्धटपणाने मताधिक्याची तोडफोड केल्याचा अर्थ घेतला जाईल.
लक्षात घेतले पाहिजे, की २०१२मध्ये मोठ्या मताधिक्याने जिंकून आलेल्या भाजपाने अस्तित्वरक्षण करण्याबरोबर भ्रष्टाचारापासून मुक्ती देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु काही लोकानुरंजक कार्यक्रम राबविले व करोडो रुपयांच्या खिरापती वाटल्या की लोक मिंधे बनतील असे नेत्यांना वाटले.
शेवटपर्यंत महिलांना खिरापती वाटल्याने त्याही आपल्यालाच मते देतील, असे भाजपा नेते निर्लज्जपणे सांगत होते; परंतु उद्धटपणापुढे खिरापती टिकणार नाहीत हाच धडा मतदार आणि महिलांनीही भाजपाला दिलाय. किंबहुना ख्रिस्ती मतदारांनी त्या वेळी भाजपाच्या पारड्यात भरभरून मते टाकण्याचे कारणही तेच होते. परंतु, ख्रिस्ती मतदारांनी या वेळी भाजपाचा तिरस्कार केला असे म्हटले असले तरी जिंकून आलेल्यांमध्ये १३पैकी ७ जण ख्रिस्ती आमदार आहेत. म्हणजे ख्रिश्चन समाज या पक्षाशी अगदीच फटकून वागलेला नाही. त्या भावनेचा या भगव्या पक्षाने आता मान ठेवणे आवश्यक बनले आहे. तसे न घडल्यास हे आमदार अस्वस्थ बनतील आणि नजीकच्या काळात भाजपाला भगदाडही पडू शकते. त्यामुळेच गोव्यात बहुसंख्य ख्रिस्ती आमदार असलेल्या या पक्षाला आपली ध्येयधोरणे आणि पक्षाचे कार्यक्रम आखताना आता अल्पसंख्याकांविषयी आदरभाव ही भावनाही बाळगावी लागेल.
काँग्रेस पक्षापुढे आता महत्त्वाची जबाबदारी आहे. या पक्षाने खूप मोठी कामगिरी बजावली होती म्हणून त्यांना लोकांनी या वेळी निवडलेय असे नव्हे, तर लोकांना भाजपाचा पराभव करायचा होता. त्यामुळे लोकांच्या अपेक्षांना उतरणे ही काँग्रेस पक्षाची पहिली जबाबदारी राहील. त्या पक्षाने आपले नैसर्गिक व विश्वासार्ह सहकारी म्हणून ‘गोवा फॉरवर्ड’कडे व रोहन खंवटे यांच्यासारख्या अपक्षांकडे मदत मागणे योग्य ठरेल. त्यासाठी दिगंबर कामत यांच्यासारख्या अनुभवी व सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकणाऱ्यांना नेतेपदी निवडावे लागेल.
केंद्रात उचापतखोर पक्ष सत्तेवर
असल्याने तर त्यांना सरकार स्थिर तसेच कार्यक्षम ठेवण्यात सारी राजकीय अक्कलहुशारी व कौशल्य पणाला लावावे लागेल. एकूण ही विधानसभा त्रिशंकूच आहे आणि अशा परिस्थितीत सरकारे अस्थिर बनणे स्वाभाविक मानले जाते. त्यावर काँग्रेस कशी मात करते व आपली विश्वासार्हता कशी टिकविते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Undeniably defeat of BJP's fidget!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.