सिक्किमप्रश्नी कूटनीतीच्या माध्यमातूनच तोडगा, भारताची स्पष्ट भूमिका
By admin | Published: July 6, 2017 08:31 AM2017-07-06T08:31:00+5:302017-07-06T12:00:54+5:30
सिक्किमच्या सीमेलगत असलेल्या डोका ला प्रदेशात चीनने सुरू केलेल्या रस्ता बांधणीवरून भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गेले सुमारे महिनाभर तणातणी सुरू आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - सिक्किमच्या सीमेलगत असलेल्या डोका ला प्रदेशात चीनने सुरू केलेल्या रस्ता बांधणीवरून भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गेले सुमारे महिनाभर तणातणी सुरू आहे.
मात्र, या प्रश्नी चीनसमोर झुकायचं नाही असे स्पष्ट करत हा प्रश्न केवळ कूटनीतीच्या माध्यमातूनच या वादावर तोडगा निघेल, अशी स्पष्ट भूमिका भारतानं घेतली आहे.
बुधवारी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितले की, हा मुद्दा कूटनीतीच्या माध्यमातून सोडवला जाऊ शकतो. चीनमधील सैनिकांनी तेथेच राहावे जेथे ते सुरुवातीपासून होते. त्यांनी भुतान परिसरात घुसखोरी केली आहे. त्यांनी या परिसरात येऊ नये. हा आमच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि हीच आमची भूमिका आहे.
सीमाप्रश्नावर बोलताना भामरे असेही म्हणाले की, चीननं भुतान परिसरात रस्ता बनवून सध्याची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आहे. हा वाद केवळ कूटनीतीच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतो. आपण चर्चा करुन सर्व समस्या सोडवू शकतो.
चीनचे राजदूत लू झाओहुई यांनी काही दिवसांपूर्वी, दोन्ही देशांत निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत भारताला कोणत्याही अटीविना आपलं सैन्य माघारी बोलवण्यास सांगितले होते. यावर प्रतिक्रिया देताना भामरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
दुसरीकडे, मुजोर चीननं पुन्हा भारताला धमकी दिली आहे. सिक्किम परिसरातील आपले सैनिक भारताने स्वत:हून मागे घ्यावेत, अन्यथा १९६२ पेक्षाही वाईट अवस्था करू, अशी धमकी चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्राने दिली आहे.
तर उद्दामपणे वागणाऱ्या चीनला रोखण्यासाठी भारताबरोबरच अमेरिका व जपान मलबार कवायतीमध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय चीनच्या हिंदी महासागरातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जीसॅट ७ म्हणजेच रुक्मिणी हा उपग्रह सज्ज आहे.
भूतान व सिक्किमच्या भागात आम्ही घुसखोरी केली नसून, आमचे सैन्य आमच्याच भागात आहे आणि तिथे रस्तेबांधणीचे काम करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, असा दावा करीत चीनने भारतावरच घुसखोरीचा आरोप केला आहे. एवढेच नव्हे, तर ते सैन्य हटवण्यात यावे, अन्यथा भारताची अवस्था १९६२ पेक्षा वाईट केली जाईल, अशी इशारेवजा धमकी चीनने दिली आहे.
संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी २०१७ चा भारत आणि १९६२ ची परिस्थिती वेगळी होती, असे केलेले विधान चीनला खूपच झोंबले दिसत आहे. त्यातूनच चिनी वृत्तपत्रातून ही धमकी दिल्याचे मानले जात आहे. युद्ध झाल्याश भारतालाच सर्वाधिक नुकसान सोसावं लागेल, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.
मोठा युद्धसराव, भारत, अमेरिका व जपान यांच्या संयुक्त कवायती
चीनच्या हिंदी महासागरातील हालचालींमुळे भारत, अमेरिका व जपान यांच्या संयुक्त कवायती मलबार कवायती या नावाने सुरू होत आहेत. चीनच्या विरोधात एकत्रितपणे ताकद दाखवण्याचा हा मार्ग आहे.
या त्रिपक्षीय युद्धाभ्यासामध्ये १५ मोठ्या युद्धनौका, दोन पाणबुड्या, अनेक विमाने तसेच टेहळणी करणारी हेलिकॉप्टर्स सहभागी होणार आहेत.
पुढील आठवड्यात हा युद्धाभ्यास सुरू होत आहे. दक्षिण चिनी समुद्रात चीनची मुजोरी वाढत असून, त्याचा त्रास जपानलाही होत आहे. त्या भागावरही चीन ताबा सांगत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाहतुकीतही अडथळे येत असल्याने चीनने ते थांबवावेत, असा अमेरिकेचा आग्रह आहे. अमेरिकेच्या गस्ती नौकांनाही चीनचा त्रास होत आहे.