झारखंडचे CM हेमंत सोरेन यांची मोठी घोषणा; आता या मुलींनाही वर्षाला मिळणार १२ हजार रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 18:52 IST2024-09-04T18:51:27+5:302024-09-04T18:52:04+5:30
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची मोठी घोषणा.

झारखंडचे CM हेमंत सोरेन यांची मोठी घोषणा; आता या मुलींनाही वर्षाला मिळणार १२ हजार रुपये
Mukhyamantri Maiya Samman Yojana : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुधवारी एक मोठी घोषणा करताना युवतींना मोठी खुशखबर दिली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार, आता १८ ते २० वयोगटातील मुलींनाही मुख्यमंत्री मैया सम्मान (JMMSY Mukhyamantri Maiya Samman Yojana) योजनेत सामाविष्ट केले जाईल. या सर्व भगिनींचे फॉर्म शासन तुमच्या दारी या कार्यक्रमात भरले जातील आणि कायदा होताच त्या लाखो मुलींच्या खात्यात मानधनही जमा होईल, अशी माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली. नुकत्याच सुरू झालेल्या या योजनेचा लाभ आतापर्यंत २१ ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना दिला जात होता. या योजनेअंतर्गत या महिलांना दरमहा एक हजार रुपये मिळतात.
झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन या योजनेचा सतत प्रचार करत आहेत. त्यांची नजर महिला मतदारांवर आहे. एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना हेमंत सोरेन म्हणाले की, अवघ्या २०-२५ दिवसांत सुमारे ५० लाख भगिनी या योजनेशी जोडल्या जात आहेत आणि त्यांना कोट्यवधी रुपयांच्या मानधनाची रक्कम दिली जात आहे. अन्न, वस्त्र, घर या सर्व गरजा प्रत्येक गरीब आणि श्रीमंताला लागतात. 'सोना सोबरण' या योजनेंतर्गत आम्ही लाखो गरीबांना वर्षातून दोनदा धोतर-लुंगी आणि साडी देखील देत आहोत. गरीब जनतेला सन्मान देण्याचे काम आम्ही केले आहे.
हेमंत सोरेन पुढे म्हणाले की, मागील डबल इंजिन सरकारने ११ लाख शिधापत्रिका रद्द केल्या होत्या, आम्ही २० लाख नवीन शिधापत्रिका दिल्या. त्यातही राज्यातील जनतेशी भेदभाव करण्यात आला, आम्हाला सरकारी गोदामातून रेशन घेऊ दिले गेले नाही. पण आम्ही बाजारातून रेशन खरेदी करून लोकांना वाटले. इथे रोज विरोधक सरकार पाडण्यात आणि आमदार फोडण्यात मग्न असतात. त्यांना देशाची आणि राज्याची पर्वा नाही, त्यांना फक्त सत्ता हवी आहे.