अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम लवकरच वारस निवडणार
By admin | Published: December 25, 2015 12:44 AM2015-12-25T00:44:15+5:302015-12-25T00:44:15+5:30
डोंगरीतल्या छोट्याशा गल्लीतून गुन्ह्यांची सुरुवात करून गुन्हेगारीचे साम्राज्य उभा करणारा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम वाढते वय आणि प्रकृतीमधील
मुंबई : डोंगरीतल्या छोट्याशा गल्लीतून गुन्ह्यांची सुरुवात करून गुन्हेगारीचे साम्राज्य उभा करणारा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम वाढते वय आणि प्रकृतीमधील चढ-उतारांमुळे गुन्हेगारीतून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे.
येत्या शनिवारी दाऊद ६० व्या वर्षात पदार्पण करत असून या निमित्ताने पाकिस्तानात जंगी पार्टी आयोजित करण्यात आली आहे. या बर्थडे पार्टीमध्ये दाऊद त्याचा वारसदार जाहीर करेल, अशी चर्चा गुन्हेगारी वर्तुळात सुरू आहे. दाऊदचा वारसदार म्हणून त्याचा भाऊ अनिस अहमद, हुमायू मुस्तकीम, तसेच त्याचा विश्वासू साथीदार छोटा शकील यांची नावे आघाडीवर असून दाऊदची पत्नी मेहजबीन, मुलगी महारुख आणि मुलगा मोईन यांची नावेही चर्चेत आहेत.
दरम्यान, दाऊदचा भाऊ नूराचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा दुसरा भाऊ इक्बाल कासकर भारतात परतला. आता त्याचे तीन भाऊ अनिस, हुमायू आणि मुस्तकीम त्याच्यासोबत राहतात. हुमायू आणि मुस्तकीम गँगमध्ये तितके सक्रिय नाहीत. आजारपणामुळे मुस्तकीम घरीच असतो. त्यामुळे भाऊ म्हणून अनिसकडे दाऊदचा वारसा येण्याची शक्यता जास्त आहे. दाऊदची पत्नी, मुले त्याच्यासोबत असली तरी, त्यांचा गुन्हेगारी जगताशी तितका संबंध नाही.
ज्यांना दाऊदच्या बर्थ डे पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे त्यांनाही पार्टीची जागा अजून सांगण्यात आलेली नाही. पार्टीच्या काही मिनिटे आधी त्यांना हॉटेलमधून थेट पार्टीच्या ठिकाणी नेण्यात
येईल. (प्रतिनिधी)