उद्योजकांनी ब्रॅण्ड इंडियाचा ठसा जगभर उमटवावा; सीआयआयच्या सभेत मोदींचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 04:14 PM2021-08-12T16:14:34+5:302021-08-12T16:15:37+5:30
भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने पुढे जाऊ लागली असून, उद्योग, व्यवसायांना चांगले वातावरण उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, कोणे एकेकाळी विविध कायद्यांनी जखडलेले उद्योग क्षेत्र आता मोकळा श्वास घेऊ लागले असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली : देशाच्या उद्योग क्षेत्राने उत्पादन क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करून ‘ब्रॅण्ड इंडिया’चा ठसा जगभर उमटवावा. सरकार कायमच
त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.
भारतीय उद्योग महासंघ (सीआयआयच्या) वार्षिक बैठकीला ऑनलाइन मार्गदर्शन करताना मोदी यांनी वरील आश्वासन दिले. भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने पुढे जाऊ लागली असून, उद्योग, व्यवसायांना चांगले वातावरण उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, कोणे एकेकाळी विविध कायद्यांनी जखडलेले उद्योग क्षेत्र आता मोकळा श्वास घेऊ लागले असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
कायद्यांमध्ये केले योग्य ते बदल
आमच्या सरकारने कंपनी कायद्यामध्ये अनेक चांगले बदल केले असून, त्याचे फायदे लवकरच दिसू लागतील. त्याचप्रमाणे कामगार कायद्यामध्येही बदल केले आहेत. या बदलामुळे आता व्यवसाय करणे अधिक सुगम होणार आहे. त्यामुळेच आपण ब्रॅण्ड इंडिया तयार करून त्याचा प्रसार जगभर करण्याची काळाची गरज आहे. यासाठी सरकार सर्व ती मदत उद्योगांना देणार असल्याचे ते म्हणाले.
भारतीय अर्थव्यवस्था तेजीने पुढे जात असून, त्याचा लाभ उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे. उद्योजकांनी आता अधिक प्रमाणामध्ये जोखीम उचलण्यास तयार रहावे, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.