बेरोजगारांची फसवणूक प्रकरण
By admin | Published: January 31, 2015 12:34 AM2015-01-31T00:34:28+5:302015-01-31T00:34:28+5:30
Next
>विमानतळ महिला अधिकाऱ्यासहतिघांचा जामीन अर्ज फेटाळलाबेरोजगारांची ४४ लाखांनी लुबाडणूकनागपूर : नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची ४४ लाख ५० हजार रुपयांनी लुबाडणूक केल्या प्रकरणी शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश वसंत कुळकर्णी यांच्या न्यायालयाने विमानतळ महिला अधिकारी, दोन शिक्षक, अशा तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. माधुरी शिवराजसिंग वाघमारे रा. कमलदत्त अपार्टमेंट धंतोली, रमेश जोंधरू बावणे रा. सुदर्शननगर न्यू नरसाळा रोड आणि रवींद्र उदयभान कठाणे रा. नंदनवन झोपडपट्टी, अशी आरोपीची नावे आहेत. त्यापैकी माधुरी ही नागपूर विमानतळ येथे वरिष्ठ अधिक्षिका तर अन्य दोघे शिक्षक आहेत. यापूर्वी माधुरीचा मुलगा हर्षल याला याच गुन्ह्यात अटक झालेली आहे. स्वागतनगर येथे राहणारे मोरेश्वर वाटकर यांच्या तक्रारीवरून या आरोपींविरुद्ध धंतोली पोलिसांनी भादंविच्या ४२०, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या आरोपींनी ३१ डिसेंबर २०१३ पासून नोकरी लावून देण्याच्या गोरखधंद्याला सुरुवात केली होती. त्यांनी वाटकर यांचा साळा रुपेश चावके याला वेकोलि येथे लिपीक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून ८ लाख रुपये घेतले होते. हेच आमिष दाखवीत संदीप शाहू याच्याकडून १ लाख, कळमेश्वर येथील कुलदीप चाफले याच्याकडून ८ लाख, साकोली येथील सेवकराम तवाडे यांच्या मुलाला नोकरी लावून देण्यासाठी १९ लाख ५० हजार रुपये , अशा एकूण पाच जणांकडून ४४ लाख ५० हजार रुपये घेतले होते. रमेश बावणे आणि रवींद्र कठाणे हे तरुणांना वेकोलि आणि समाजकल्याण विभागात नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या रकमा घेत होत. ही वसुली हर्षल आणि त्याची आई माधुरी वाघमारे यांच्याकडे सोपवित होते. काही जणांनी तर या आरोपींच्या बँक खात्यात पैसे जमा केलेले आहेत. चौकशीसाठी जाणाऱ्यांना ते इतर उमेदवारांचे बोगस नियुक्तीपत्र दाखवायचे. काहींना पैसे परत म्हणून बोगस चेकही आरोपींनी दिले आहेत. अटक टाळण्यासाठी या तिन्ही आरोपींनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले असता प्रकरण गंभीर असल्याने न्यायालयाने त्यांचे अर्ज फेटाळून लावले. न्यायालयात सरकारच्यावतीने सरकारी वकील प्रफुल्ल कटारिया, आरोपींच्या वतीने ॲड. फुले, मसराम यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक डी. एस. करांडे हे तपास अधिकारी आहेत.