बेरोजगारांना ३० दिवसांत मिळेल भत्ता; ईएसआईसीच्या मंडळाची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 12:44 AM2020-09-15T00:44:58+5:302020-09-15T00:45:18+5:30
यंदाच्या वर्षात २४ मार्च ते ३१ डिसेंबर या कालावधीत ज्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतील तसेच जे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे (ईएसआयसी) सदस्य असतील अशांनाच या योजनेचा लाभ होणार आहे.
नवी दिल्ली : कोरोना साथीच्या संकटामुळे नोकरी गमावलेल्यांना तीन महिन्यांच्या पगारापैकी ५० टक्के रक्कम अटल विमा कल्याण योजनेच्या अंतर्गत मदत स्वरूपात देण्याच्या निर्णयामुळे औद्योगिक कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा भत्ता बेरोजगार झाल्यानंतर ३० दिवसांत मिळेल.
यंदाच्या वर्षात २४ मार्च ते ३१ डिसेंबर या कालावधीत ज्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतील तसेच जे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे (ईएसआयसी) सदस्य असतील अशांनाच या योजनेचा लाभ होणार आहे. हे वेतन नोकरी सुटली किंवा नोकरी जाण्याच्या शक्यतेमुळे बेरोजगारी भत्ता म्हणून दिला जाईल.
या प्रस्तावाला ईएसआईसीच्या मंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. ईएसआईसी बोर्डच्या सदस्य अमरजित कौर यांच्यानुसार ईएसआयसीच्या योग्य विमाधारक व्यक्तींना तीन महिन्यांच्या सरासरी ५० टक्के वेतनाइतका रोख लाभ मिळेल.
पात्रता मापदंड काहीसे शिथिल केले जाऊ शकतात. जर असे झाले तर लाभार्थींची संख्या दोन पट (७.५ दशलक्ष) होऊ शकते.
२१ हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन असलेल्या औद्योगिक कामगारांना ईएसआयसीच्या योजनेचा लाभ मिळतो. लाभार्थी व्यक्तीला या लाभासाठी मालकाच्या (एम्प्लॉयर) कार्यालयात जायची गरज नाही. विमाधारक ईएसआयसीच्या शाखा कार्यालयात जाऊन दावा करू शकतो. मालकाकडे क्लेमच्या खातरजमेचे कामही शाखा कार्यालय स्तरावर केले जाईल. त्यानंतर पैसे थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केले जातील.
आधार कार्डचा लागेल क्रमांक
१२ आकड्यांचे (डिजिट) आधार कार्ड क्लेमदरम्यान ओळख पटण्यासाठी वापरले जाईल.
२०१८ पासून ही प्रक्रिया सुरू असलेल्या अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत होईल.
२५ टक्के बेरोजगारी या योजनेत लाभ देण्याची तरतूद आहे; परंतु त्यात तांत्रिक अडचणी येत होत्या.