धक्कादायक आकडेवारी! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात 12.6% लोकांनी गमावल्या नोकऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 07:02 PM2022-03-16T19:02:05+5:302022-03-16T19:03:59+5:30
Unemployment Rate : कोरोनाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक आणि घातक ठरली आहे. या काळात गेल्या वर्षी शहरी भागातील बेरोजगारीचा दर दुहेरी अंकावर पोहोचला होता.
नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच दुसरीकडे लाखो लोकांचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे मोठं संकट निर्माण झालं. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार होती. अनेकांना रोजगार देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांना कोरोनाचा थेट फटका बसला आहे. कोरोनाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक आणि घातक ठरली आहे. या काळात गेल्या वर्षी शहरी भागातील बेरोजगारीचा दर दुहेरी अंकावर पोहोचला होता. एप्रिल आणि मे महिन्यात 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमधील बेरोजगारीचा दर 12.6 टक्क्यांवर पोहोचला होता. तर जानेवारी ते मार्च महिन्यात हे प्रमाण 9.3 टक्के होते.
एप्रिल-जून तिमाहीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरातील लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. National Statistical Office ने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल-जून 2021 च्या तिमाहीत महिलांचा रोजगारातील सहभाग 20.1 टक्क्यांवर घसरला आहे. तर मागील तिमाहीत हा दर 21.2 टक्के होता. यासह, एकूण श्रमशक्ती सहभाग (LFPR) देखील जानेवारी-मार्च 2021 च्या तिमाहीत 47.5 टक्क्यांवरून सुमारे 46.8 टक्क्यांवर आला आहे. LFPR म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येतील असे लोक जे काम करत आहेत किंवा कामासाठी उपलब्ध आहेत.
कोरोनाचा मोठा फटका! लाखो लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
एप्रिल-जून 2021 या तिमाहीत सर्व वयोगटातील लोकांसाठी बेरोजगारीचा दर 12.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर जानेवारी-मार्च तिमाहीत हा दर केवळ 9.3 टक्के होता. त्यावेळेस बेरोजगारीचा दर दुहेरी अंकावर पोहोचला असला तरी हा दर महामारीच्या पहिल्या लाटेपेक्षा खूपच कमी होता. महामारीच्या पहिल्या लाटेदरम्यान, संपूर्ण देशातील बेरोजगारीचा दर सुमारे 20.8 टक्क्यांवर पोहोचला. एप्रिल-जून 2021 मध्ये महिलांमधील बेरोजगारीचा दर 14.3 टक्क्यांवर पोहोचला, जो मागील तिमाहीत 11.8 टक्के होता. याच कालावधीत, पुरुषांमधील बेरोजगारीचा दर जानेवारी-मार्च तिमाहीत 8.6 टक्क्यांवरून 12.2 टक्क्यांवर पोहोचला आहे.
National Statistical Office च्या आकडेवारीनुसार, एप्रिल-जून 2021 या तिमाहीत 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये वर्कर पॉप्युलेशन दर 40.9% पर्यंत घसरला आहे. तर मागील तिमाहीत तो 43.1 टक्के होता. एप्रिल-जून, 2021 मध्ये, पुरुषांसाठी कामगार लोकसंख्या 64.2% होती. तर मागील तिमाहीत तो 67.2 टक्के होता. दुसरीकडे, महिलांमध्ये पाहिले तर हा दर 17.2 टक्के होता. तर जानेवारी-मार्च तिमाहीत तो 18.7 टक्के होता. एप्रिल-जून तिमाहीत 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची संख्या वाढून सुमारे 40.7 टक्के झाली आहे. तर मागील तिमाहीत ते सुमारे 39.3 टक्के होते. लॉकडाऊनमुळे त्या काळात मोठ्या प्रमाणात लोक बेरोजगार झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.