बेरोजगारीचा दर ७.६ टक्क्यांवर, पंतप्रधान मोदींची डोकेदुखी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 04:19 AM2019-05-04T04:19:33+5:302019-05-04T04:20:20+5:30
एप्रिलमध्ये भारताचा बेरोजगारीचा दर वाढून ७.६ टक्क्यांवर गेला आहे
नवी दिल्ली : एप्रिलमध्ये भारताचा बेरोजगारीचा दर वाढून ७.६ टक्क्यांवर गेला आहे. ऑक्टोबर २०१६ नंतरचा हा सर्वोच्च बेरोजगारी दर ठरला आहे. मार्चमध्ये बरोजगारीचा दर ६.७ टक्के होता.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. सीएमआयईचे प्रमुख महेश व्यास यांनी सांगितले की, मार्चमध्ये बेरोजगारीचा दर अनपेक्षिपतणे खाली आला होता. तो आता आधीच्या महिन्यांतील कलाला सुसंगत होऊन पुन्हा वाढला आहे. सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही आकडेवारी डोकेदुखी ठरू शकते. कारण ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात बेरोजगारीचा दर वाढला आहे. १९ मेपर्यंत लोकसभा निवडणूक चालणार आहे. पुढील टप्प्यातील मतदानासाठी बेरोजगारीचा वाढलेल्या दर विरोधकांना नवे हत्यार देणारा ठरणार आहे.