अनपेक्षित प्रशस्तिपत्राने आयकरदाते सुखावले!
By admin | Published: October 12, 2016 06:10 AM2016-10-12T06:10:09+5:302016-10-12T06:10:09+5:30
प्रामाणिक करदात्यांसह सर्वच करदात्यांचा छळ करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आयकर विभागाने करदात्यांना कर भरल्याबद्दल प्रशस्तिपत्रे पाठवून आश्चर्याचा धक्का
नवी दिल्ली : प्रामाणिक करदात्यांसह सर्वच करदात्यांचा छळ करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आयकर विभागाने करदात्यांना कर भरल्याबद्दल प्रशस्तिपत्रे पाठवून आश्चर्याचा धक्का दिला आहे. देशभरातील हजारो करदात्यांना ही प्रशस्तिपत्रे ई-मेलने पाठविली गेली. आयकर विभागाकडून अशा प्रकारची अजिबातच अपेक्षा नसल्याने अनेक करदात्यांचा यावर विश्वासच बसला नाही व त्यांनी हे मेल स्पॅममध्येही टाकले.
ज्यांनी हा मेल ओपन केला त्यांना मात्र त्यासोबत पाठविलेले स्वत:च्या नावाचे आकर्षक रंगसंगतीमधील प्रशस्तिपत्र वाचून अभिमान वाटला व त्यांनी ते आप्तेष्टांना दाखवून कौतुक करून घेतले. संबंधित करदात्याने सन २०१६-१७ या करनिर्धारण वर्षासाठीचा आपल्या वाट्याचा आयकर भरला आहे व रीटर्नही भरले आहेत. आपल्या थोर देशाच्या जडणघडणीस हातभार लावल्याबद्दल हे प्रशस्तिपत्र देऊन आम्ही कौतुक करीत आहोत, अशा आशयाचे हे प्रमाणपत्र आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अध्यक्षा राणी सिंग नायर यांच्या स्वाक्षरीने ही प्रमाणपत्रे दिली गेली आहेत. प्रमाणपत्राच्या तळाशी बारकोड आहे, पण त्याचा करदात्याला उपयोग काय, हे मात्र स्पष्ट होत नाही. करदात्यांची त्यांनी भरलेल्या कराच्या रकमेनुसार वर्गवारी करून त्यांना प्लॅटिनम, सुवर्र्ण, रौप्य, व ब्रॉन्झ अशा श्रेणींत ही प्रमाणपत्रे दिली गेली आहेत. साधारणत: १ लाख ते १0 लाख यादरम्यान कर अदा करणाऱ्यांना ब्रॉन्झ, १0 ते ५0 लाख यामधील करदात्यांना रौप्य, ५0 लाख ते १ कोटी कर अदा करणाऱ्यांना सुवर्ण तर १ कोटीपेक्षा जास्त कर भरणाऱ्या मोजक्या करदात्यांना प्लॅटिनम वर्गातील प्रशस्तिपत्रे पाठविण्यात आली आहेत.
या संदेशांची प्रशंसा होत आहे, तशीच त्यावर टीकाही केली जात आहे. हे संदेश काय उपयोगाचे आहेत? लोकांना मूर्ख बनवू नका, अशी टीका काही लोकांनी केली आहे.
ज्यांनी आपला संपूर्ण कर भरला आहे तसेच ज्यांनी आपले रीटर्न आॅनलाइन व ३१ जुलैच्या आत भरले आहे, अशांना ही संदेशवजा प्रमाणपत्रे पाठविली गेली आहेत. सध्या हे संदेश ई-मेलद्वारे पाठविले जात आहेत. तथापि, गेल्या महिन्याच्या अखेरीस काही प्रमाणपत्रांचे वितरण अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते करण्यात आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)