"जे इस्लाममध्ये जन्माला आले नाहीत ते दुर्दैवी’’,  ममता बॅनर्जींच्या मंत्र्याच्या अजब दावा  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 03:58 PM2024-08-02T15:58:51+5:302024-08-02T15:59:25+5:30

West Bengal News: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या फिरहाद हकीम यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे.

"Unfortunate are those who are not born in Islam", Mamata Banerjee's minister firhad hakim's strange claim   | "जे इस्लाममध्ये जन्माला आले नाहीत ते दुर्दैवी’’,  ममता बॅनर्जींच्या मंत्र्याच्या अजब दावा  

"जे इस्लाममध्ये जन्माला आले नाहीत ते दुर्दैवी’’,  ममता बॅनर्जींच्या मंत्र्याच्या अजब दावा  

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या फिरहाद हकीम यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. जुलै महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय कुराण स्पर्धेमध्ये संबोधित करताना हकिम यांनी ‘’जे लोक इस्लाममध्ये जन्माला येत नाहीत, ते दुर्दैवी आहेत. तसेच ते दुर्दैव घेऊन जन्माला येतात. त्यांना इस्लामच्या चौकटीत आणलं पाहिजे’’, असं विधान केलं होतं. 

या विधानावरून वाद झाल्यानंतर हकीम यांनी सारवासारव करत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असा दावा केला आहे. कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी मुस्लिम आहे. मात्र नियमितपणे दूर्जा पूजा आणि कालीपूजेचं आयोजन करतो, असं त्यांनी सांगितलं.  हकीम यांनी जुलै महिन्यात केलेल्या केलेल्या या विधानाला भाजपाच्या आमदारांनी तीव्र विरोध केला होता. हकीम विधानसभेमध्ये जेव्हा आपली बाजू मांडण्यासाठी उभे राहिले. तेव्हा भाजपाच्या आमदारांनी त्यांचा निषेध करून सभात्याग केला.

यावेळी हकीम म्हणाले की, जेव्हा मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी उभा राहतो, तेव्हा विरोधी पक्षाचे आमदार सभागृहातून बाहेर पडतात, हे पाहणं दुर्दैवी आहे. जर माझ्या कुठल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात असेल, तर मी काय करू शकतो. इथे उपस्थित असलेले भाजपाचे नेते डॉ. शंकर घोष यांच्यासह उपस्थित असलेले लोक मला धर्मनिरपेक्ष मानतात की नाही, हे सांगू शकतात का. मी धर्मनिरपेक्ष आहे, हे सर्वांना माहिती आहे. या सभागृहाबाहेर एखा कार्यक्रमामध्ये केलेल्या माझ्या विधानावरून राजकारण करणं योग्य नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

मी कधीही कुठल्याही अन्य धर्माच्या लोकांना अपमान केलेला नाही. तसेच शेवटच्या श्वासापर्यंत मी तसं करणार नाही. मी परधर्मीय लोकांचा सन्मान करतो. मी इस्लामचा अनुयाई आहे. मात्र मी नियमितपणे दूर्गापूजा आणि कालीपूजेचं आयोजन करतो, असेही हकीम यांनी सांगितले. 

दरम्यान, पश्चिम बंगालच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी  म्हणाले की, त्या समारंभामध्ये तुम्हाला महापौर आणि मंत्री म्हणून निमंत्रित करण्यात आलं होत. तुम्ही तिथे जे काही बोललात, ते मी सांगत नाही आहे. तुमच्या भाषणाचा पहिला भाग योग्य होता. मात्र दुसऱ्या भागात तुम्ही इतर धर्माच्या लोकांना त्या धर्मात दाखल होण्यास सांगितलं ज्या धर्माचं पालन तुम्ही करता. तुम्ही आमची माफी मागावी असं मी सांगणार नाही. मात्र ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांची तुम्ही माफी मागितली पाहिजे, अशी मागणी शुभेंदू अधिकारी यांनी केली.  
 

Web Title: "Unfortunate are those who are not born in Islam", Mamata Banerjee's minister firhad hakim's strange claim  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.