कृतघ्न! भूकंपाच्या संकटात केलेल्या मदतीचा तुर्कीला विसर, ओकली भारताविरोधात गरळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 14:56 IST2023-03-04T14:56:07+5:302023-03-04T14:56:59+5:30
Turkey : भूकंपाच्या संकटकाळात भारताने पुढाकार घेऊन तुर्कीला मोठ्या प्रमाणावर मदत दिली होती. मात्र भारताने केलेल्या मदतीचा अवघ्या काही दिवसांतच तुर्कीला विसर पडल्याचे चित्र आहे.

कृतघ्न! भूकंपाच्या संकटात केलेल्या मदतीचा तुर्कीला विसर, ओकली भारताविरोधात गरळ
काही दिवसांपूर्वी तुर्कीमध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंपामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती. या संकटकाळात भारताने पुढाकार घेऊन तुर्कीला मोठ्या प्रमाणावर मदत दिली होती. मात्र भारताने केलेल्या मदतीचा अवघ्या काही दिवसांतच तुर्कीला विसर पडल्याचे चित्र आहे. तसेच तुर्की पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला आहे.
इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीसोबत मिळून तुर्कीने पाकिस्तानची बाजू घेतली आहे. संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक मंचावर तुर्की पाकिस्तानची बाजू घेत भारतविरोधी प्रॉपेगेंडा चालवणाऱ्यांसोबत उभा राहत आहे. भूकंपाच्या संकटकाळात भारताने केलेली मदत विसरून संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर पाकिस्तान आणि ओआयसीच्या सुरात सूर मिसळत तुर्कीने भारत जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन करत असल्याचं सांगितलं.
दरम्यान, तुर्कीने घेतलेल्या या भूमिकेमुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. मात्र भारतानेही संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये मांडण्यात आलेल्या जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. यूएनएचआरसीमध्ये भारताच्या प्रतिनिधी सीमा पुंजानी यांनी सांगितले की, सर्वसामान्यांचं जीवन, त्यांची उपजीविका आणि स्वातंत्र्यांच्या मुद्द्यांवरून झगडत असलेल्या पाकिस्तानच्या भारताविरोधात उभ्या राहण्यामुळे त्यांच्या चुकीच्या प्राधान्यक्रमांचा उलगडा होत आहेत मी पाकिस्तानचं नेतृत्व आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगेन की, त्यांनी निराधार प्रॉपेगेंडा चालवण्याऐवजी सर्वसामान्यांच्या हितांसाठी आपली शक्ती खर्च करावी.
पुंजानी यांनी तुर्कीच्या भूमिकेबाबतही चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, आम्ही भारताच्या अंतर्गत प्रश्नाबाबत तुर्कीने केलेल्या वक्तव्यामुळे दु:ख झालं आहे. माझा सल्ला आहे की, आमच्या अंतर्गत प्रश्नांवर विनाकारण टिप्पण्या करणं तुर्कीनं टाळलं पाहिजे. त्यांनी सांगितले की, ओआयसीने जम्मू काश्मीरबाबत केलेले वाह्यात वक्तव्य आम्ही फेटाळून लावतो.