विनाअनुदानित गॅस ३५.५0 रुपयांनी महाग; जीएसटीही कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:57 AM2018-08-02T00:57:10+5:302018-08-02T00:57:50+5:30
राजधानी दिल्लीत विनाअनुदानित स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) १ आॅगस्टपासून ३५.५0 रुपयांनी, तर सबसिडीचा गॅस १.७६ रुपयांनी महागला आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत विनाअनुदानित स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) १ आॅगस्टपासून ३५.५0 रुपयांनी, तर सबसिडीचा गॅस १.७६ रुपयांनी महागला आहे.
इंडियन आॅईल कॉर्पोरेशनने (आयओसी) एक दिवस आधीच ही माहिती जारी केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर किमतींमध्ये झालेला बदल व विदेशी चलनातील बदल यामुळे विनाअनुदानित गॅसच्या किमतीत सुधारणा करावी लागत आहे, तसेच जीएसटीतील बदलामुळे अनुदानित सिलिंडर महाग होत आहे, असे आयओसीने म्हटले आहे. प्रत्येकाला वर्षात १२ अनुदानित गॅस सिलिंडर मिळतात. त्यानंतर विनासबसिडीचे वाढीव किमतीचे सिलिंडर त्यांना घ्यावे लागतात. आयओसीने म्हटले आहे की, आॅगस्ट २0१८ या महिन्यासाठी दिल्लीतील ग्राहकांना अनुदानित गॅस सिलिंडरसाठी १.७६ रुपये जास्तीचे द्यावे लागतील. या बदलामुळे अनुदानित सिलिंडरची किंमत ४९८.0२ रुपये झाली आहे. जुलै २0१८ मध्ये ती ४९६.२६ रुपये होती.
जमा होणार २९१ रुपये
आयओसीने म्हटले आहे की, दिल्लीत विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत आॅगस्ट २0१८ साठी ३५.५0 रुपयांची वाढ केली जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत्या किमती व विदेशी चलनातील चढ-उतार यामुळे ही दरवाढ करावी लागत आहे. अनुदानित सिलिंडरच्या दरवाढीला जीएसटी जबाबदार आहे. बँकेत जमा होणाऱ्या अनुदानाची रक्कमही आॅगस्ट २0१८ पासून वाढेल. आता २९१.४८ रुपयांचे अनुदान ग्राहकांना मिळेल. जुलैमध्ये २५७.७४ रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा होत होते.